द 'डॉगममी'; 50 वर्षांनी सापडला झाडात अडकलेल्या कुत्र्याचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 18:07 IST
दक्षिण जॉर्जियामध्ये एक झाड पाडून झाल्यावर ते वाहून नेण्यासाठी ट्रकमध्ये भरण्यात येत होते. त्याचवेळेस त्याच्या पोकळ बुंध्यामध्ये एका लाकूडतोड्याचे लक्ष गेले. त्यावेळेस त्या झाडामध्ये एका कुत्र्याचा मृतदेह असल्याचं त्याच्या लक्षात आलं.
द 'डॉगममी'; 50 वर्षांनी सापडला झाडात अडकलेल्या कुत्र्याचा मृतदेह
जॉर्जिया- इजिप्तमध्ये पूर्वजांचे तसेच विविध राजांच्या मृतदेहांचे पिरॅमिडमध्ये वेगवेगळी रसायने, मसाले लावून ममी करण्याची पद्धती होती. त्याबद्दल भरपूर साहित्य, सिनेमे प्रसिद्ध झाले आहेत. मात्र आता एका कुत्र्याची ममी झाल्याचे पहिल्यांदाच उघड झाले आहे. झाड कापताना त्याच्यावरती असणारी पानं, फांद्या, किंवा एखादे पक्ष्याचे घरटे पडणे अशा घटना घडतात. पण एका झाडाच्या बुंध्यात चक्क कुत्र्याचा मृतदेह सापडल्यावर झाड तोडणारे लोक चक्रावून गेले आहेत.
दक्षिण जॉर्जियामध्ये एक झाड पाडून झाल्यावर ते वाहून नेण्यासाठी ट्रकमध्ये भरण्यात येत होते. त्याचवेळेस त्याच्या पोकळ बुंध्यामध्ये एका लाकूडतोड्याचे लक्ष गेले. त्यावेळेस त्या झाडामध्ये एका कुत्र्याचा मृतदेह असल्याचं त्याच्या लक्षात आलं. हा कुत्रा झाडातून बाहेर पडण्याची झटापट अखेरच्या क्षणांमध्ये करत असावा असं त्याच्याकडे पाहिल्यावर दिसतं. एका पोकळ झाडामध्ये खारीसारख्या प्राण्याचा पाठलाग करताना हा शिकारी कुत्रा शिरला असावा. पाठलाग करत तो वर गेल्यावर त्याला मागे वळणे शक्य झाले नाही आणि तो मेला असावा असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हा कुत्रा झाडाच्या बरोबरमध्ये अडकला असल्याने त्याच्यापर्यंत इतर प्राण्यांना पोहोचता आले नाही त्यामुळे त्याचा मृतदेह टिकून राहिला. तसेच तो ज्या झाडात अडकला ते चेस्टनट ओकचे झाड होते. या झाडामध्ये टॅनिन्स असते. त्याचा उपयोग टॅक्सीडर्मीसाठी केला जातो. म्हणजेच मेलेले प्राणी कुजू नये म्हणून होणाऱ्या प्रक्रियेत त्याचा वापर केला जातो. त्यामुळेच कुत्र्याचा मृतदेह मर्यादेपलिकेड कुजला नाही. टॅनिन्स कुत्र्यावर झिरपत राहिले आणि त्याचा मृतदेह तसाच राहिला. हा ममी झालेला कुत्रा सापडल्यावर लाकूडतोड्यांनी त्याला स्टकी (अडकलेला) असं नाव दिलं असून त्याला म्युझियममध्ये ठेवलं आहे.