वॉशिंग्टन - भारतात मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी अमेरिकेने २ कोटी डॉलर खर्च करण्याची गरज काय असा सवाल करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी भारताला मिळणारं फंडिंग रोखण्याचे संकेत दिलेत. फ्लोरिडा इथल्या मियामी येथील समिटमध्ये ते बोलत होते. भारतात इतका पैसा खर्च का करायचा? मतदान वाढवण्यासाठी २ कोटी डॉलर? कदाचित त्यांना भारतात अन्य कुणाला जिंकताना पाहायचं होतं असं सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्यो बायडन प्रशासनावर निशाणा साधला आहे. त्याशिवाय इलॉन मस्क यांनी भारतात टेस्ला कार उत्पादन करण्याचा निर्णय घेतला तो चुकीचा आहे अशी नाराजी ट्रम्प यांनी व्यक्त केली.
याआधीही डोनाल्ड ट्रम्प यांनी २ कोटी डॉलर फंडिग रोखण्याच्या निर्णयाचं समर्थन केले होते. भारतासारख्या देशाला अशाप्रकारे मदत देण्याची गरजच काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आम्ही भारताला २ कोटी डॉलर का देत आहोत, त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. ते जगातील सर्वाधिक कर वसूल करणारा देश आहे. त्यांच्याकडे कर खूप अधिक आहेत. मी भारताचा आणि त्यांच्या पंतप्रधानांचा खूप आदर सन्मान करतो परंतु मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी २ कोटी डॉलर का द्यायचे असा सवाल ट्रम्प यांनी केला.
इलॉन मस्क यांच्या नेतृत्वात १६ फेब्रुवारीला DOGE ने विविध देशांना दिली जाणारी फंडिग रोखण्याची घोषणा केली होती. ज्यात भारतात मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी २ कोटी डॉलर निधीचा समावेश होता. अमेरिकेने भारतात मतदान वाढवण्यासाठी दिला जाणारा २ कोटी डॉलर निधी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका भारतात निवडणूक काळात ही मदत करत होते परंतु यापुढे भारताला ही फंडिंग मिळणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यापासून सातत्याने वेगवेगळे धाडसी निर्णय घेत आहे. त्यात या निर्णयामुळे भारताला फटका बसला आहे.
मस्क यांच्या निर्णयानं ट्रम्प नाराज
दरम्यान टेस्ला कंपनीने भारतात फॅक्टरी उघडण्यावरून डोनाल्ड ट्रम्प नाराज आहेत. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांना भारतात त्यांच्या कार विकणे शक्य नाही. त्यांनी भारतात फॅक्टरी उघडणे हे अमेरिकेसाठी चुकीचे ठरेल. एका टीव्ही मुलाखतीत ट्रम्प यांनी भारतात आयात होणाऱ्या कारवर जास्त कर लागत असल्याचा उल्लेख केला. मी पंतप्रधान मोदींशी बोललो होतो. दोन्ही देश लवकरात लवकर व्यापार कराराच्या दिशेने काम करण्यावर सहमत झाले परंतु कराबाबत त्यांची भूमिका अद्यापही स्पष्ट नाही. जगातील अनेक देश आमचा फायदा घेतात. मस्क यांना भारतात कारखाना टाकण्याचा अधिकार आहे परंतु त्यांचे हे पाऊल अमेरिकेसाठी नुकसानदायक ठरेल. अमेरिकेसाठी हे खूप चुकीचे आहे असं त्यांनी सांगितले.