मागच्या काही काळापासून कमालीचा अशांत असेलल्या पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतामध्ये पुन्हा एकदा भीषण स्फोट झाला आहे. कोळसा खाणीतील कामगारांना घेऊन जात असलेल्या वाहनाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या या स्फोटामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर काही जण जखमी झाले आहेत. या परिसरात याआधीही स्फोटाच्या अशा घटना घडल्या आहेत.
हा स्फोट बलूचिस्तान प्रांतामधील हरनई येथे झाला. कोळसा खाणीमधील कामगारांना घेऊन जात असलेल्या एका पिकअप वाहनात स्फोटकांच्या माध्यमातून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा स्फोट रिमोटने संचालित होणाऱ्या यंत्राच्या माध्यमातून घडवण्यात आला. दरम्यान, आतापर्यंत कुठल्याही संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. ट्रकमध्ये १७ खाणकामगार असताना हा स्फोट झाल्याची माहिती या विभागाचे उपायुक्त हजरत वली आगा यांनी दिली.
स्थानिक डॉक्टरांनी जखमींबाबत माहिती देताना सांगितले की, जखमींपैकी दोघा जणांची प्रकृती गंभीर आहे. पाकिस्तानमधील बलूचिस्तान प्रांत खनिजसंपत्तीने समृद्ध आहे. हा भाग इराण आणि अफगाणिस्तानला लागून आहे. येथे फुटीरतावादी बलूच समुहांकडून मागच्या अनेक दशकांपासून कारवाया सुरू आहेत.