रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरूच असून, रशियाने गुरुवारी पहाटे युक्रेनची राजधानी कीववर मोठा हल्ला केला आहे. युक्रेनियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात रशियाने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर केला. या हल्ल्यात तीन जण ठार झाली असून जवळपास १२ जण जखमी झाले आहेत. शिवाय, या हल्ल्यामुळे शहरातील अनेक निवासी इमारतींचे मोठे नुकसान झाले असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
कीवमधील शहरी प्रशासनाचे प्रमुख तैमूर तकाचेन्को यांनी सांगितले की, या हल्ल्यात किमान चार जणांचा मृत्यू झाला असून, त्यात एका १४ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. तसेच, २४ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कीवमधील २० हून अधिक भागांवर या हल्ल्याचा परिणाम झाला आहे. बचाव पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्कामध्ये युद्ध संपवण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतरचा हा कीववरील पहिलाच मोठा हल्ला आहे.