लाहोर : ७ मे रोजी पाकिस्तानमधील बहावलपूर येथे जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये त्या संघटनेचा संस्थापक व दहशतवादी मौलाना मसूद अजहरच्या कुटुंबाच्या ठिकऱ्या उडाल्या, अशी कबुली या संघटनेचा कमांडर इलियास काश्मिरी याने दिली आहे. यूट्युबवर मंगळवारी प्रसारित झालेल्या एका व्हिडीओमध्ये तो भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूरदरम्यान केलेल्या हल्ल्यांविरोधात विखारी भाषेत वक्तव्य करताना दिसतो. या हल्ल्यात अजहरच्या कुटुंबातील काही सदस्य मारले गेले होते.
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
हा व्हिडीओ पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ६ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या "मिशन मुस्तफा" या परिषदेतील असल्याचे सांगितले जात आहे. बंदूकधाऱ्यांनी वेढलेल्या अवस्थेत उभा असलेला जैश कमांड इलियास काश्मिरी याने म्हटले आहे की, पाकिस्तानच्या सीमांच्या रक्षणासाठी आम्ही दिल्ली, काबूल आणि कंधारवर हल्ले केले. त्यामुळे भारताने ७ मे रोजी बहावलपूरमध्ये हल्ला करून मौलाना मसूद अजहरच्या कुटुंबातील सदस्यांच्या ठिकऱ्या उडविल्या. (वृत्तसंस्था)
कोण आहे मसूद अजहर?
१९९९ साली आयसी-८१४ विमान अपहरण प्रकरणात भारतीय प्रवाशांच्या बदल्यात मसूद अजहरची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर बहावलपूर हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्य केंद्र बनले. मे २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने मसूद अजहरला ‘जागतिक दहशतवादी’ घोषित केले.
पहलगाम हल्ल्यानंतर तणाव वाढला
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यात बहुतांश पर्यटक होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव खूप वाढला.
पहलगाम नरसंहाराला ठोस प्रत्युत्तर देत, भारतीय सशस्त्र दलांनी ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत जैश-ए-मोहम्मदच्या बालेकिल्ला बहावलपूरसह अनेक दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले.
त्यावेळी मसूद अजहरच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले होते की, बहावलपूरमधील जामिया मस्जिद सुभान अल्लाह येथे भारताने केलेल्या हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील १० सदस्य आणि ४ जवळचे सहकारी मारले गेले.
मृतांमध्ये अजहरची मोठी बहीण व तिचा पती व अन्य काहीजण होते. त्यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानी लष्करातील जनरल, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि उच्च पदस्थ नोकरशहा हजर होते.