पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. भारतासाठी 'मोस्ट वॉन्टेड' असलेला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरपाकिस्तानव्याप्त काश्मीर मधील गिलगित-बाल्टिस्तानमध्ये दिसला आहे. त्याचे नेहमीचे ठिकाण असलेल्या बहावलपूरपासून तब्बल हजार किलोमीटर दूर तो दिसल्याने अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, मसूद अजहर स्कार्दू येथील सादपारा रोड परिसराच्या आसपासच्या भागात फिरताना पाहिला गेला. या परिसरात दोन मशिदी, मदरसे आणि अनेक खासगी तसेच सरकारी गेस्ट हाऊस आहेत. विशेष म्हणजे, अलीकडेच पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी दावा केला होता की, मसूद अजहर हा पाकिस्तानात नसून, तो अफगाणिस्तानमध्ये असू शकतो. इतकेच नाही, तर अजहर पाकिस्तानात आढळल्यास त्याला भारताच्या ताब्यात देण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. मात्र, आता पीओकेमध्ये मसूद अजहर दिसल्याने बिलावल यांचा दावा सपशेल खोटा ठरला आहे आणि पाकिस्तान त्याला भारताच्या ताब्यात देणार का, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्येही वाचला होता अझहर
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते, ज्यात जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते. या कारवाईत अजहर कसातरी वाचला, परंतु त्याचे कुटुंबातील दहा सदस्य आणि चार जवळचे साथीदार मारले गेले होते. यामुळे त्याला मोठा धक्का बसला होता. जैश-ए-मोहम्मदने दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, भारतीय हवाई हल्ल्यात मसूद अजहरची मोठी बहीण, मेहुणा, पुतण्याची पत्नी आणि पुतणी मारली गेली. तसेच, पाच लहान मुलांचाही हवाई हल्ल्यात मृत्यू झाला होता.
पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार, भारताच्या मोस्ट वॉन्टेड यादीत अव्वल
मसूद अजहर हा भारतात झालेल्या अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार आहे. २०१६च्या पठाणकोट हवाई दल तळावरील हल्ला आणि २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यामागे तोच होता. पुलवामा हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते, त्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला करून अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. भारत सरकारने जाहीर केलेल्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत मसूद अजहरचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. बंदी घातलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तो प्रमुख आहे. कंदाहर विमान अपहरण प्रकरणानंतर भारताने त्याला सोडल्यानंतर त्याने जैश-ए-मोहम्मदची स्थापना केली होती.