मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू हे त्यांच्या भारतविरोधी भूमिकेमुळे सातत्याने चर्चेत असतात. दरम्यान, याच मुइज्जू यांनी आता एक खास रेकॉर्ड बनवला आहे. मोहम्मद मुइज्जू यांनी सलग १५ तास पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचा विक्रम रचल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबत मुइज्जू यांच्या कार्यालयाकडून माहिती देण्यात आली असून, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी युक्रेनचे नेते वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सर्वात मोठ्या पत्रकार परिषदेबाबतचा विक्रम मोडला आहे, असे त्यात म्हटले आहे.
४६ वर्षीय मुइज्जू यांनी स्थानिक वेळेनुसार शनिवारी सकाळी १० वाजता मॅरेथॉन पत्रकार परिषदेला सुरुवात केली. मात्र यादरम्यान नमाज पढण्यासाठी काही वेळ घेण्यात आला होता. मुइज्जू यांनी एकूण १४ तास ५४ मिनिटांपर्यंत सलग प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ही पत्रकार परिषद मध्यरात्रीनंतरही सुरू होती. ही पत्रकार परिषद कुठल्याही देशाच्या राष्ट्रपतींकडून रचला गेलेला एक राष्ट्रीय विक्रम आहे. या दरम्यान, मुइज्जू हे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होते. तत्पूर्वी २०१९ साली ऑक्टोबर महिन्यात युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदोमिर झेलेन्स्की यांनी १४ तासांची पत्रकार परिषद घेतली होती, तसेच त्यांनी बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झँड्रो लुकाशेंको यांनी घेतलेल्या ७ तासांच्या पत्रकार परिषदेचा विक्रम मोडीत काढला होता. तर आता मोहम्मद मुइज्जू यांनी झेलेन्की यांचा विक्रम मोडीत काढला आहे.
मोहम्मद मुइज्जू यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये अनेक पत्रकार सहभागी झाले होते. त्यांच्या उपाहाराची सोय करण्यात आली होती. याआधी २००९ मध्ये मालदीवचे तत्कालीन राष्ट्रपती मोहम्मद नशील यांनी पाण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली होती. समुद्राच्या वाढत्या जलस्तरामुळे उदभवणाऱ्या धोक्याकडे जगाचं लक्ष वेधून घेणं हा या पत्रकार परिषदेचा हेतू होता. दरम्यान, मोहम्मद मुइज्जू यांनी या मॅरेथॉन पत्रकार परिषदेदरम्यान, भारताबाबत काही विधानं केली होती. त्यामुळे आता मुइज्जू यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. मालदीवचे माजी परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी शनिवारी मोहम्मद मुइज्जू यांनी भारताबाबत केलेल्या विधानांवर टीका केली आहे.