F-35 Stealth Fighter Jet: जगातील सर्वात प्रगत, महागडे आणि रडारच्या नजरेतून निसटणारे अमेरिकेचे एफ-३५ स्टील्थ फायटर जेट इराणने पाडल्याचा दावा केला आहे. रडारला चकवा देण्यात प्रसिद्ध असलेल्या या पाचव्या पिढीतील विमानाला इराणच्या क्षेपणास्त्राने लक्ष्य केल्याने जागतिक संरक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशन गार्ड्स कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, मध्य इराणी हवाई हद्दीत स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री २:५० वाजता ही कारवाई करण्यात आली. अमेरिकन आणि इस्रायली बनावटीच्या १२५ पेक्षा जास्त ड्रोनचा ताफा रोखल्यानंतर, इराणच्या एअर डिफेन्स सिस्टमने या फायटर जेटला टार्गेट केले.
कसे पाडले 'अदृश्य' विमान?
एफ-३५ हे विमान त्याच्या स्टील्थ तंत्रज्ञानासाठी ओळखले जाते. मात्र, इराणने आपल्या स्वदेशी बावर-३७३ या एअर डिफेन्स सिस्टमचा वापर करून हे विमान पाडल्याची माहिती समोर आली. यामध्ये पॅसिव्ह सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असावा, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. हे तंत्रज्ञान रडार सिग्नल न सोडता विमानाचा वेध घेऊ शकते, ज्यामुळे वैमानिकाला हल्ला होत असल्याचे समजत नाही.
अमेरिकेची कबुली आणि 'इमर्जन्सी लँडिंग'
सुरुवातीला मौन बाळगल्यानंतर अमेरिकन सेंट्रल कमांडने या घटनेला दुजोरा दिला आहे. अमेरिकेनुसार, इराणच्या वर एका मिशनवर असताना एफ-३५ ला तातडीने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. विमानाचे मोठे नुकसान झाले असून वैमानिकाची प्रकृती स्थिर असल्याचे कॅप्टन टिम हॉकिन्स यांनी सांगितले. मात्र, हे लँडिंग तांत्रिक बिघाडामुळे झाले की इराणच्या हल्ल्यामुळे, याची चौकशी सुरू असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
एफ-३५ वर हल्ला होणे ही मोठी बाब का आहे?या एका विमानाची किंमत १०० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ८३० कोटी रुपये) पेक्षा जास्त आहे. हे विमान एकाच वेळी हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर हल्ला आणि नजर ठेवण्यास करण्यास सक्षम आहे. याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त (१९३१ किमी/तास) आहे. हे विमान अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांच्या हवाई शक्तीचा कणा मानले जाते. जर हे विमान रडारवर दिसले आणि पाडले गेले, तर अमेरिकेच्या दाव्याला मोठा धक्का बसणार आहे.
अमेरिकेचे आतापर्यंत १६ विमानं नष्ट
माध्यमांच्या वृत्तानुसार, युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेने आतापर्यंत किमान १६ विमानं गमावली आहेत. यामध्ये अनेक एमक्यू-९ रीपर ड्रोन्सचाही समावेश आहे. मात्र,एफ-३५ सारखे प्रगत लढाऊ विमान लक्ष्य होणे हे अमेरिकेसाठी अत्यंत चिंताजनक मानले जात आहे.
Web Summary : Iran claims it downed a US F-35 stealth fighter with its Bavar-373 system. The US confirms an emergency landing due to unspecified issues, but is investigating. The incident raises concerns about stealth technology and US air power, especially given the jet's high cost and capabilities.
Web Summary : ईरान ने अमेरिकी एफ-35 स्टील्थ फाइटर जेट को बावर-373 सिस्टम से मार गिराने का दावा किया है। अमेरिका ने विमान की आपातकालीन लैंडिंग की पुष्टि की, लेकिन जांच जारी है। इस घटना ने स्टील्थ तकनीक और अमेरिकी वायु शक्ति पर सवाल खड़े कर दिए हैं।