ऑनलाईन स्कॅम आणि डिजिटल फ्रॉड करणाऱ्या टोळ्यांवर कंबोडियामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. भारताचं गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या आवाहनानंतर कंबोडिया सरकारने मागच्या १५ दिवसांपासून देशातील विविध भागात कारवाया करत सुमारे ३ हजार ७५ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये १०५ भारतीय नागरिकांचा समावेश आहे.
कंबोडियामधून भारतामध्ये डिजिटल अरेस्टचा खेळ सुरू असल्याची गोपनीय माहिती गृहमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाला मिळाली होती. त्यानंतर या कारवाईबाबत सूत्रे फिरवण्यात आली. या कारवाईदरम्यान, कंबोडियामधील १३८ ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ६०६ महिलांचा समावेश आहे. तसे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये १०५ भारतीय, १०२८ चिनी, ६९३ व्हिएतनामी, ३६६ इंडोनेशियाई, १०१ बांगलादेशी, ८२ थाई, ५७ कोरियन, ८१ पाकिस्तानी, १३ नेपाळी आमि ४ मलेशियाई नागरिकांचा समावेश आहे. त्याशिवाय फिलिपिन्स, नायजेरिया, म्यानमार, रशिया आणि युगांडा या देशातील नागरिकांचाही अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे.
या कारवाईदरम्यान, मोठ्या संख्येने संगणक, लॅपटॉप, मोबाईल, ड्रग्स, हत्यारे, गोळ्या, चिनी आणि भारतीय पोलिसांचे बनावट गणवेश, ड्रग्स प्रोसेसिंग मशीन जप्त करण्यात आली. या प्रकरणामध्ये आणखी काही लोकांवरही अटकेची कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.