मादागास्करमध्ये Gen Z आंदोलकांच्या तीव्र आंदोलनामुळे सत्तांतर घडलं आहे. त्यानंतर आता देशाची सत्ता लष्कराच्या हातात गेली असून कर्नलला राष्ट्रपती म्हणून शपथ देण्यात येणार आहे. कर्नल माइकल रँड्रियनिरिना हे शुक्रवारी उच्च संविधानिक न्यायालयात आयोजित एका कार्यक्रमात मेडागास्करमधील राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील.
देशातून पळाले राष्ट्रपती अँड्री राजोएलिना
मादागास्करमध्ये राष्ट्रपती अँड्री राजोएलिना यांनी Gen Z आंदोलनामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याचे कारण देत देश सोडून पळ काढला. सध्या ते अज्ञातस्थळी आहेत. मादागास्करला आफ्रिकन युनियनमधून निलंबित करण्यात आले आहे. इथे झालेलं सत्तांतर अमान्य आहे असं युनियनने म्हटले आहे. तीन आठवड्यांच्या प्राणघातक सरकारविरोधी निदर्शनांनंतर सशस्त्र दल देशावर नियंत्रण घेत आहेत असं कर्नल रँड्रियानिरिना यांनी अलीकडेच सांगितले.
युवकांनी केली निदर्शने
मादागास्करमध्ये युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष उफाळून आला. सरकारी सुविधांचा बोजवारा, गरीबी, बेरोजगारी यासारख्या विविध मुद्द्यांवरून युवकांनी आंदोलन हाती घेतले. सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आले. मादागास्कर याआधी बांगलादेश, नेपाळमध्येही युवकांच्या तीव्र आंदोलनामुळे देशात सत्तांतर घडले आहे. मादागास्करमध्ये आंदोलनाचा भडका उडाला त्यानंतर तेथील राष्ट्रपती अँड्री राजोएलिना यांना फ्रान्सच्या सैन्य विमानाने देशाबाहेर काढले. याबाबत फ्रान्सने कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. राजोएलिना यांच्याकडे फ्रान्सचं नागरिकत्व आहे, त्यामुळेही देशातील लोकांमध्ये नाराजी होती.
दरम्यान, राष्ट्रपतींच्या पलायन आणि महाभियोग मतदानामुळे लष्कराने देशाची सूत्रे हाती घेतली. लष्कराने संसदेच्या कनिष्ठ सभागृहाव्यतिरिक्त सर्व संस्था बरखास्त केल्या आहेत. २५ सप्टेंबर रोजी अनियमित पाणी आणि वीज पुरवठ्यावरून सुरू झालेले हे आंदोलन लवकरच भ्रष्टाचार, गैरव्यवस्थापन आणि गरिबीकडे सरकारच्या दुर्लक्षाविरुद्ध देशव्यापी चळवळीत रूपांतरित झाले. लष्कराची एक तुकडीही या आंदोलनात सहभागी झाल्याने परिस्थिती चिघळली. लष्कराच्या या तुकडीने राष्ट्रपती तसेच मंत्र्यांनी पद सोडावे, अशी मागणी केली, तसेच आंदोलकांवर गोळीबार करण्यास लष्कराने नकार दिला होता. मादागास्करच्या लोकसंख्येपैकी जवळपास तीन चतुर्थांश लोक गरिबीत जीवन जगत असून तरुणांमधील बेरोजगारी आणि विस्थापनातून हा असंतोष उफाळून आला.
Web Summary : Gen Z protests in Madagascar led to a coup. President fled, a colonel assumed power amid unrest over poverty and corruption. African Union suspended Madagascar.
Web Summary : मेडागास्कर में जेन जेड के विरोध के कारण तख्तापलट हुआ। राष्ट्रपति भाग गए, गरीबी और भ्रष्टाचार के बीच कर्नल ने सत्ता संभाली। अफ्रीकी संघ ने मेडागास्कर को निलंबित कर दिया।