पाकिस्तानी मंत्र्यांची सुरक्षा सध्या धोक्यात असल्याचा धक्कादायक खुलासा एका रिपोर्टमधून झाला आहे. पाकिस्तानमधील मंत्री, राजकारणी, अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्तींचे फोन टॅपिंग आणि डेटा लीक झाल्याबद्दल एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, पाकिस्तानमधील मंत्र्यांच्या फोनचे लोकेशन ५०० पाकिस्तानी रुपयांत मिळू शकते, जे भारतीय रुपयांमध्ये फक्त १५५ रुपये आहे.
या अहवालामुळे पाकिस्तानातील राजकीय गोंधळ वाढला आहे. अनेक मंत्री आणि नेते आधीच फोन टॅपिंगचे आरोप करत असतानाच हा रिपोर्ट समोर आला आहे. या अहवालात म्हटले आहे की १०,००० हून अधिक लोकांचे फोन रेकॉर्ड केले जात आहेत.
६०० रुपयांमध्ये मिळतात फोन रेकॉर्ड!एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, सायबर हॅकर्स अवघ्या ६०० रुपयांमध्ये (२००० पाकिस्तानी रुपये) नेत्यांचे फोन कॉल रेकॉर्ड करत आहेत. इतकंच नाही तर, संबंधित पक्षाला डेटा देखील सहजपणे देत आहेत. परदेशात गेल्यावरही नेते आणि मंत्र्यांचे फोन सहज टॅप केले जात आहेत. यासाठी अवघे १००० रुपये (३००० पाकिस्तानी रुपये) आकारले जात आहेत.
४ प्रकारे लीक होत आहे डेटा!पाकिस्तान सरकारच्या म्हणण्यानुसार, सर्वप्रथम, पाकिस्तानचे नागरिक जे सिम कार्ड खरेदी करत आहेत ते वेबसाइटद्वारे ताबडतोब त्यांच्या नियंत्रणाखाली घेतले जातात. ज्या व्यक्तीकडे ते सिम कार्ड आहे, त्याचे लोकेशन सतत शोधले जाते. यानंतर फोन टॅप केले जात असून, ते देखील विकले जात आहेत. या अहवालाने पाकिस्तानची डिजिटल गोपनीयता उघडकीस आणली आहे.
मिनिट मिररच्या वृत्तानुसार, काही वेबसाइट्सद्वारे हा डेटा लीक होत आहे आणि फोन टॅप केले जात आहेत. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेने २०२३ मध्येच पाकिस्तानी दूरसंचार विभागाला याबद्दल सतर्क केले होते, परंतु या साइट्सवर कोणतीही कारवाई होऊ शकली नाही. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी आता नव्याने चौकशी करण्याचे सांगितले आहे. नक्वी म्हणतात की हे दुर्दैवी आहे. आम्ही १४ जणांची एक समिती स्थापन केली आहे, जी अहवाल सादर करेल. त्यानंतर आम्ही पुढील कारवाई करू.