वॉशिंग्टन : भारताने १९९० पासून बाल व प्रौढ मृत्युदर घटविण्यात मोठी झेप घेतली आहे. भारतातील बालकांसह प्रौढ मंडळी आता दोन दशकांपूर्वीपेक्षा अधिक आणि आरोग्यदायी जीवन जगत आहेत, असे एका नव्या संशोधनामध्ये आढळून आले आहे. संसर्गजन्य आजारामुळे आणि हृदयाशी संबंधित आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने जगभरातील लोकांचे आयुष्य वीस वर्षांपूर्वीपेक्षा वाढल्याचे संशोधनात आढळून आले. भारताच्या लोकसंख्येचा आकार व वाढीचा दर पाहता हा देश लवकरच सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल. घटलेल्या मृत्युदराचा हा परिणाम असेल, असे संशोधकांनी म्हटले. (वृत्तसंस्था)२०१३ मध्ये जगातील एकूण मृत्यूपैकी भारतात १९ टक्के अथवा १२ लाख मृत्यू झाले. १९९० नंतर भारताने बाल व प्रौढ मृत्युदर घटविण्यामध्ये मोठी आघाडी घेतली. मृत्युदरातील दरवर्षीची सरासरी घट बालकांसाठी ३.७ टक्के, तर प्रौढांसाठी १.३ टक्के एवढी आहे. १९९० ते २०१३ दरम्यान जन्मावेळी आयुर्मान अपेक्षा महिलांसाठी ५७.३ वर्षांहून ६४.२ वर्षे, तर पुरुषांसाठी ५८.२ वर्षांहून ६८.५ वर्षे एवढी झाली. भारतातील बालके आणि प्रौढ आता अधिक जीवन जगत आहेत ही बाब कमालीची उत्साहवर्धक आहे, असे पब्लिक हेल्थ फाऊंडेशन आॅफ इंडियाचे डॉ. जिमोन पन्नीयाम्माकल म्हणाले. हे संशोधन द लान्सेटमध्ये प्रकाशित झाले असून डॉ. जिमोन त्याचे सहलेखक आहेत. वॉशिंग्टन विद्यापीठातील इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॉल्युएशनच्या नेतृत्वाखाली ७०० संशोधकांच्या एका चमूने हे संशोधन केले. या चमूत डॉ. पन्नीयाम्माकल यांचा समावेश होता.