जगभरात दबदबा असलेला उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन सध्या चीन दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या एससीओ समिटसाठी जगभरातील नेते चीनमध्ये दाखल झाले असतानाच, आता किम जोंग उन देखील चीनमध्ये पोहोचले आहेत. व्लादिमीर पुतिन आणि शी जिनपिंग यांच्यासोबत त्यांचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. पण, किम जोंग उन हे एकटेच चीनला गेलेले नाही, तर त्यांच्यासोबत त्यांची १२ वर्षांची मुलगी किम जू ए ही देखील दिसली आहे. यामुळे आता ती चर्चेत आली आहे. पण इतक्या लहान वयात ती जागतिक समिटमध्ये का गेली, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
किम जू ए हिला किम जोंग उन यांची म्हणजेच उत्तर कोरियाची संभाव्य उत्तराधिकारी मानले जात आहे. यामुळेच किम जोंग उन हे तिला आपल्यासोबत चीनला घेऊन गेले आणि स्वतः पुतिन व जिनपिंग यांच्याशी तिची ओळख करून दिली.
चीनची राजधानी बीजिंगमध्ये झालेल्या विजय दिनाच्या परेडमध्येही ती किम जोंग उनच्या जवळ बसलेले दिसली. किम जोंग उनच्या मुलीला सार्वजनिक कार्यक्रमात पाहण्याची ही पहिलीच वेळ होती. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्या पद्धतीने ती वडिलांसोबत या मोठ्या कार्यक्रमात गेली आणि जागतिक नेत्यांशी तिने संवाद साधला यावरून ती किम जोंग उनची उत्तराधिकारी असेल असे कयास बांधले जात आहेत. किम जोंग उन सध्या फक्त ४१ वर्षांचे आहेत. जगाला किम जोंग उन आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल फारशी माहिती नाही. उत्तर कोरियामध्ये माध्यमांवर खूप निर्बंध असल्याने तिथली फार कमी माहिती लोकांसमोर येते.
२०२२ मध्ये पहिल्यांदा किम जोंग उनची मुलगी किम जू ए जगासमोर आली होती. ती तिच्या वडिलांसोबत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपण कार्यक्रमात सहभागी झाली होती. माजी एनबीए स्टार डेनिस रॉडमन यांनी जगाला तिची ओळख करून दिली. रॉडमन म्हणाले की ते २०१३ मध्ये प्योंगयांगला गेले होते आणि याच काळात ते किमला भेटले. या भेटीदरम्यान किम जोंग उन यांनी त्यांची पत्नी री सोल जू आणि त्यांच्या लहान मुलीची ओळख करून दिली.
उत्तर कोरियाकहा हुकूमशहा किम जोंग उन यांचे लग्न २००९ मध्ये झाले. गेल्या काही वर्षांत, उत्तर कोरियाच्या माध्यमांमध्ये किम जू ए बद्दल बातम्या येत आहेत. उत्तर कोरियातही तिला विशेष सन्मान मिळत असून, तिचे खूप कौतुकही होत आहे.