टोकियो : जपानचेपंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी रविवारी पदत्याग करण्याची घोषणा केली. जुलै महिन्यात झालेल्या निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी हा निर्णय घेतला. वाढत्या दबावामुळे त्यांना सत्तेत राहणे कठीण झाले होते.
ऑक्टोबर २०२४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारलेल्या इशिबा यांनी महिनाभरापासून पक्षातील दक्षिणपंथी विरोधकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले होते.
लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी लवकरच नेतृत्व बदलासाठी मतदान घेण्याचा निर्णय घेणार असून, या प्रक्रियेला मंजुरी मिळाल्यास तो त्यांच्या विरोधातील अविश्वास ठरेल, असेही मानले जात आहे.
शनिवारी त्यांनी कृषिमंत्री शिंजिरो कोइझुमी आणि माजी पंतप्रधान योशिहिदे सुगा यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेतला.
अस्थिरता टाळण्यात अपयश
इशिबा यांनी यापूर्वी पदावर कायम राहण्याचा निर्धार व्यक्त केला होता. अमेरिकन टॅरिफ, अर्थव्यवस्थेवरील परिणाम, वाढती महागाई, तांदूळ धोरणातील सुधारणा आणि प्रादेशिक तणाव यांसारख्या गंभीर आव्हानांचा सामना करणाऱ्या जपानमध्ये राजकीय अस्थिरता टाळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले होते.
पराभवानंतर मात्र, पक्षांतर्गत नेतृत्वबदलाची मागणी जोर धरत होती. इशिबा यांच्या पदत्यागानंतर एलडीपी लवकरच नवीन पक्षाध्यक्ष निवडण्यासाठी निवडणुकीची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे.