टोकियो : इस्लामिक स्टेट्सच्या ताब्यातील एका जपानी ओलिसाची हत्या केल्याची चित्रफीत प्रसिद्ध करण्यात आली असून, यामुळे जपानी नागरिकांना जबरदस्त धक्का बसला आहे. दरम्यान, जपानचे पंतप्रधान शिन्जो अॅबे यांनी या घटनेचा निषेध केला आहे.इस्लामिक स्टेट्सच्या जिहादींच्या ताब्यात दोन जपानी ओलिस होते व त्यांच्या सुटकेसाठी जिहादींनी २०० दशलक्ष डॉलरची मागणी केली होती. त्यानंतर जपानचे सरकार व नागरिक ओलिसांच्या सुटकेसाठी प्रयत्न करीत होते; पण एका ओलिसाची हत्या झाल्याची चित्रफीत पाहिल्यानंतर संपूर्ण राष्ट्र सुन्न झाले असून, दुसरा ओलिस केनजी गोटो (४७, पत्रकार ) याच्या सुटकेकडे लोकांनी डोळे लावले आहेत. जपानचे पंतप्रधान शिन्जो अॅबे यांनी एनएचके या सरकारी वाहिनीवर येऊन दहशतवाद्यांकडे गोटोला सुरक्षित सोडण्याची मागणी केली. इसिसने प्रसिद्ध केलेली चित्रफीत खरी असावी, असे मानण्यास जागा आहे. सरकार अजूनही या चित्रफितीची पाहणी करीत आहे. या चित्रफितीबरोबर काय संदेश आहे हे सांगण्यास अॅबे यांनी नकार दिला आहे. गोटोच्या सुरक्षित सुटकेसाठी एक कैदी सोडण्याची मागणी या चित्रफितीत करण्यात आली आहे. मी अवाक् झालो आहे, अशा कृतींचा आम्ही कठोरपणे व पूर्णपणे अशा कृतींचा निषेध करीत आहोत, असे मृत ओलिस युवकाचे पिता शोईची यांनी पत्रकारांना सांगितले. माझ्या मुलाचा मृत्यू झाला नसावा, असे मला आतून वाटत आहे. आपण त्याला कधीच पुन्हा पाहणार नाही, असे वाटले असते तर त्याला आलिंगन देण्याची माझी इच्छा होती, असेही शोईची म्हणाले. जपानचे पंतप्रधान शिन्जो अॅबे यांनी इराक व सिरियात जपानी सैनिक वाढविण्याची घोषणा केली होती, तसेच इसिसविरोधात चाललेल्या लढ्यासाठी २०० दशलक्ष डॉलरची मदत जाहीर केली होती. त्यांच्या या निर्णयावर जपानमध्ये टीका होत आहे. (वृत्तसंस्था)
जपानी ओलिसाची इसिसकडून हत्या
By admin | Updated: January 26, 2015 03:16 IST