पाकिस्तानीदहशतवादी हाफिज सईदच्या दहशतवादी संघटनेबाबत मोठी बातमी येत आहे. त्याने जैश ए मोहम्मद या संघटनेचे नाव बदलून अल-मुराबितुन असे ठेवले आहे. भारताविरोधातील दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करण्याच्या मार्गात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
जैश-ए-मोहम्मदसारख्या संघटनांवर विविध देशांकडून आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून निर्बंध लादले गेले आहेत. यामुळे त्यांना वेगवेगळ्या देशातील विद्रोही लोकांकडून पैसा गोळा करताना अडचण येत आहे. यामुळे सईदने आपल्या संघटनेचे नावच बदलून टाकले आहे. 'अल-मुराबितुन' या शब्दाचा अर्थ 'इस्लामचे रक्षक' असा आहे. या संघटनेने ई-वॉलेट आणि यूपीआयसारख्या डिजिटल पेमेंट पद्धतींचा वापर सुरू केला आहे. या माध्यमातून ते ४ अब्ज पाकिस्तानी रुपयांचा निधी गोळा करण्याचा प्रयत्न करत असून, त्यांना ३०० हून अधिक प्रशिक्षण केंद्रे (मराकाज) उघडायची आहेत.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर जैशने आपला तळ अफगाणिस्तानच्या सीमेवर, विशेषतः खैबर पख्तूनख्वा प्रांतात हलविला आहे. जैशने या भागात 'मरकझ शोहादा-ए-इस्लाम' या प्रशिक्षण केंद्राचा विस्तार केला आहे. तर हिज्बुल मुजाहिदीनने बंदाई, खैबर येथे 'एचएम-३१३' नावाचे नवीन प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. भारताने एलओसी जवळची ९ प्रशिक्षण केंद्रे उध्वस्त केली होती. भारताने केलेल्या हल्ल्यात हाफिज सईदचे कुटुंबही मारले गेले आहे.