भारतावर लादलेल्या ५० टक्के करमुळे दोन्ही देशांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (१२ सप्टेंबर २०२५) मान्य केले. एवढेच नाही तर, भारतावर ५० टक्के कर लादणे सोपे नव्हते, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. खरे तर, भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करत असल्याने ट्रम्प प्रशासनाने भारतावर ५० टक्के कर लादला आहे. यात 25 टक्के सामान्य करत आणि २५ टक्के अतिरिक्त पेनाल्टीचा समावेश आहे.
'दोन्ही देश कराराच्या अगदी जवळ' -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील राजदूत पदासाठी सर्जियो गोर यांची नियुक्ती केली आहे. यासंदर्भात बोलताना गोर म्हणाले, अमेरिकेने पुढील आठवड्यात वॉशिंग्टनला येण्यासाठी भारतीय शिष्टमंडळाला आमंत्रित केले आहे आणि दोन्ही देश एका कराराच्या अगदी जवळ आहेत. ते म्हणाले, "आम्ही भारतीय नेत्यांशी चर्चा करत आहोत. राष्ट्रपतींनी पुढील आठवड्यात भारताच्या वाणिज्य आणि व्यापार मंत्र्यांना बैठकीसाठी बोलावले आहे. यावेळी ते राजदूत ग्रीर यांनाही भेटतील. या बैठकीत एका महत्त्वाच्या करारावर चर्चा केली जाईल. आम्ही आता करारापासून फार दूर नाही. केवळ काही गोष्टींवरच चर्चा सुरू आहे."
"अमेरिका क्वाड समूहासंदर्भात वचनबद्ध" - सर्जियो गोर यांनीही म्हटले आहे की, अमेरिका क्वाड समूहासंदर्भात (भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया) पूर्णपणे वचनबद्ध आहे. हा समूह अत्यंत महत्वाचा आहे. तसेच, या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या क्वाड शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारतात येऊ शकतात, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.
गोर पुढे म्हणाले, "राष्ट्रपती क्वाडच्या बैठका सुरू ठेवण्यासाठी आणि समूह अधिक बळकट करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. पुढील क्वाड बैठकीसाठी त्यांच्या यात्रेसंदर्भात आधीच चर्चा झाली आहे."