गाझा पट्टीमध्ये इस्रायली सैन्याने केलेल्या बॉम्बहल्ल्यात गाझा शहरातील सर्वात मोठे मेडिकल सेंटर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. हे मेडिकल सेंटर रक्त तपासणी, कर्करोग उपचार आणि इतर अनेक गंभीर आजारांवर उपचारांचे प्रमुख केंद्र होते. पॅलेस्टिनी मेडिकल रिलीफ सोसायटीने मंगळवारी ही माहिती दिली आहे.
रुग्णालयावर हल्ला का?
इस्रायली सैन्याने गाझामधील अनेक रुग्णालयांवर आणि वैद्यकीय केंद्रांवर वारंवार बॉम्बहल्ला केला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी या रुग्णालयांचा वापर लपण्यासाठी केला असल्याचा दावा इस्रायल करत आहे. मात्र, इस्रायलने या संदर्भात फारसे पुरावे सादर केलेले नाहीत. या हल्ल्यामुळे आता गाझातील आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इस्रायलने दिला होता 'हा' आदेश
गाझा शहरातील मध्य समीर भागात असलेले हे सहा मजली मेडिकल सेंटर इस्रायली सैन्याने रिकामे करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर लगेचच केलेल्या हल्ल्यात ही संपूर्ण इमारत मातीत मिसळली. या हल्ल्यात मेडिकल रिलीफ सोसायटीची आणखी दोन केंद्रेही उद्ध्वस्त झाली आहेत. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, अल-रंतिसी चिल्ड्रन हॉस्पिटल आणि स्पेशलाइज्ड आय हॉस्पिटल देखील इजरायली लष्करी कारवायामुळे बंद करावे लागले आहेत.
WHO प्रमुखांचा संताप
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अदनोम गेब्रेयसस यांनी या हल्ल्याची तीव्र निंदा केली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले की, “आरोग्य सुविधांवर होणारे हल्ले थांबायलाच पाहिजेत. ही निरर्थक हिंसा थांबवा आणि तात्काळ युद्धबंदी जाहीर करा!”
मानवी मदत पोहोचवणारा मार्गही बंद
दरम्यान, इजरायलने गाझा पट्टीमध्ये मदत आणि मानवी सहाय्य पोहोचवणाऱ्या एकमेव मार्गालाही बंद केले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या एका हल्ल्यात दोन इजरायली नागरिक ठार झाले होते. त्यानंतर वेस्ट बँक आणि जॉर्डनला जोडणारा 'एलेनबी ब्रिज' पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हा पूल गाझातील मानवी मदतीसाठी महत्त्वाचा मार्ग मानला जातो. त्यामुळे आता गाझातील नागरिकांची स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.