वाॅशिंग्टन - आपला अणू कार्यक्रम गुंडाळण्यासाठी इराणला आम्ही ६० दिवसांची मुदत दिली होती. मात्र त्या देशाने काहीही केले नाही. आता इस्रायलनेइराणवर हल्ले केले आहेत. यापेक्षाही भीषण काही घडण्याचीही शक्यता आहे, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी दिला आहे.
ट्रम्प यांनी म्हटले की, अणू कार्यक्रम बंद करावा यासाठी मी इराणला अनेक संधी दिल्या. पण कशाचाही उपयोग झाला नाही. जगातील अनेक देशांनी केलेली विनंती इराण धुडकावून लावत असेल तर त्याचे अतिशय वाईट परिणाम होतील हे याआधी त्यांना सांगून झाले होते. इस्रायलने आता हल्ले केले आहेत. जगातील सर्वात घातक शस्त्रे अमेरिका बनवते. ती कशी चालवावीत हे इस्रायलला माहिती आहे. त्या शस्त्रांचा सदर देशाकडे मोठा साठा आहे. त्यामुळे भविष्यात ते आणखी काही पावले उचलू शकतात अशी शक्यता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली.
‘इराणमधील अनावश्यक प्रवास टाळा’भारताने इराणमधील आपल्या नागरिकांना सतर्क राहाण्याचा इशारा दिला आहे. या देशात भारतीयांनी अनावश्यक प्रवास टाळावा असे भारताने म्हटले आहे.
नष्ट करण्याची भाषा सहन करणार नाहीइस्रायलच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या इराणचा प्रतिकार करण्यासाठी आम्ही हल्ले केले. इस्रायलवर हल्ले करा, असे आवाहन इराणचे हुकूमशहा वारंवार करत आहेत. त्यांनी हिंसक वक्तव्ये करण्याबरोबरच अण्वस्त्रनिर्मिती कार्यक्रमही अमलात आणला आहे, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे.