हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यानंतर इस्राइलने हमासविरोधात युद्ध पुकारून गाझामध्ये सुरू केलेल्या कारवाईला आता तीन वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र तीन वर्ष लोटल्यानंतरही हा संघर्ष थांबलेला नाही. दरम्यान, गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुन्हा एकदा व्यापक प्रयत्न सुरू झाले असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा शांतता योजनेवरून हमासला पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा दिला आहे. हमासने आता शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमध्ये उशीर न करता त्वरित निर्णय घेतला पाहिजे. तसे न केल्यास सर्व अटी संपल्याचे समजले जाईल. याबाबत कुठलाही उशीर सहन केला जाणार नाही, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे.
याबाबत सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या आपल्या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्राइलचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, इस्राइलने ओलिसांची सुटका आणि शांतता कराराला पुढे नेण्यासाठी बॉम्बवर्षाव तात्पुरता थांबवला आहे. आता कोणत्याही प्रकारसा हिंसाचार हा खपवून घेतला जाणार नाही. आता हमासने तात्काळ पुढाकार घेतला पाहिजे. अन्यथा सारं काही संपुष्टात येईल. गाझा पुन्हा संकटात येईल, असा परिणाम किंवा उशीर मी सहन करणार नाही. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर पावलं उचण्यात यावी. सर्वांसोबत न्यायपूर्ण वर्तव केलं जाईल, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.