इस्लामाबाद - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतपाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. या दोन्ही देशात युद्धाचे ढग पसरले आहेत त्यातच पाकिस्तानच्या एका मशिदीत झालेल्या घोषणेनंतर पाकिस्तानी सैन्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे. खैबर पख्तूनख्वा, ज्याठिकाणी तहरीक ए तालिबानचा दबदबा आहे, तिथल्या मशिदीत युद्धाच्या काळात भारतीय सैन्याला साथ देण्याची घोषणा झाली आहे. मशिदीतील मौलानाने केलेली घोषणा समोर आली आहे त्यात त्यांनी युद्ध झाल्यास भारताला साथ देण्याची घोषणा लोकांसमोर केली आहे.
या मशिदीत मौलानाने घोषणा केली आहे की, मी कुरानची शपथ घेतो, जर भारताने हल्ला केला तर आम्ही भारतीय सैन्याला साथ देऊ. यावेळी मौलानाने हाती कुरान घेतले होते. हा व्हिडिओ खैबर पख्तूनख्वाचा आहे जिथे पाकिस्तानी सैन्य स्थानिक लोकांविरोधात क्रूर सैन्य ऑपरेशन चालवते. बलूचिस्तानसारखे येथेही शेकडो लोक अचानक गायब होतात. अशावेळी मौलाना मोहम्मद रंगीला यांनी हे विधान केले आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या प्रसिद्ध लाल मशिदीतही अशीच विधाने पुढे आलीत.
१९६० च्या दशकात बनलेल्या इस्लामाबादमधील लाल मशीद खूप प्रसिद्ध आहे. या मशिदीतील इमामचा पाकिस्तानी जनतेवर मोठा प्रभाव आहे. लाल मशिदीचे सध्याचे इमाम मौलाना अब्दुल अजीज गाझी यांनीही मोठं विधान केले. भारतासोबत युद्धात सरकार आणि सैन्याचे समर्थन करण्यास त्यांनी साफ नकार दिला आहे. त्यांनी एका भाषणात पाकिस्तानवरच मोठा आरोप केला. भारतापेक्षा पाकिस्तानातच मुस्लिमांवर जास्त अत्याचार होतात असं त्यांनी म्हटलं होते.
मौलाना गाजी यांनी पाकिस्तानी जनतेला संबोधित केले त्यात पाकिस्तानचे हे युद्ध इस्लामच्या रक्षणासाठी नव्हे तर केवळ राष्ट्रीयतेसाठी आहे त्यासाठी आपल्याला यात सहभागी होण्याची आवश्यकता नाही असं त्यांनी सांगितले. त्याशिवाय लाल मशिदीच्या मौलाना यांनी मशिदीत उपस्थित लोकांना सवाल केला. भारताविरोधात युद्धात कोण पाकिस्तानी सेना आणि सरकारला साथ देणार असं विचारले. त्यावेळी एकानेही पाकिस्तानी सैन्याला साथ देण्यासाठी हात वर केला नाही.