मध्यपूर्वेतील धुमसणारे युद्ध आता निर्णायक आणि अत्यंत भयानक वळणावर पोहोचले आहे. इराणकडून सातत्याने होणाऱ्या मिसाईल्स आणि ड्रोन हल्ल्यांमुळे आता सौदी अरेबियाचा संयम पूर्णपणे सुटला आहे. सौदीचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान अल सऊद यांनी इराणला कडक शब्दांत सुनावले असून, "आमची सहनशक्ती आता संपली आहे," अशी उघड चेतावणी दिली आहे. यामुळे आखाती देशांमध्ये कधीही ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
'आमच्या शक्तीचा अंत बघू नका'
रियाधमध्ये आयोजित एका तातडीच्या पत्रकार परिषदेत प्रिन्स फैसल आक्रमक पवित्र्यात दिसले. ते म्हणाले, "इराणने त्यांच्या रणनीतीचा पुनर्विचार करावा. आमच्याकडे अफाट क्षमता आणि ताकद आहे, हे त्यांनी विसरू नये. जर हे हल्ले थांबले नाहीत, तर सौदी अरब आणि आमचे मित्रराष्ट्र चोख प्रत्युत्तर देण्यास मागे-पुढे पाहणार नाहीत." सौदीने अद्याप लष्करी कारवाईची अधिकृत घोषणा केली नसली तरी, त्यांच्या विधानावरून युद्धाचे ढग गडद झाले आहेत.
ऊर्जा केंद्रांवर टार्गेटेड अटॅक
इराणने केवळ विस्कळीत हल्ले केले नसून, ते एका मोठ्या कटाचा भाग असल्याचा आरोप सौदीने केला आहे. बुधवारी इराणने जगातील सर्वात मोठ्या एलएनजी केंद्रांपैकी एक असलेल्या कतारच्या 'रास लाफन' गॅस प्लांटवर हल्ला केला. तसेच युएईच्या 'हबशन' प्लांटलाही लक्ष्य केले. युएईच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी १३ बॅलिस्टिक मिसाईल्स आणि २७ ड्रोन हवेतच नष्ट केले आहेत.
सौदीच्या दिशेने झेपावली क्षेपणास्त्रे
इराणच्या या आक्रमणातून सौदी अरेबियाही सुटलेला नाही. सौदी संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, रियाधच्या दिशेने येणारी चार क्षेपणास्त्रे त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टिमने पाडली. तर दोन मिसाईल्स देशाच्या पूर्व भागाकडे डागण्यात आली होती. इराणने या हल्ल्यांचे समर्थन करताना म्हटले आहे की, इस्रायलने त्यांच्या 'साउथ पार्स' गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याचा हा बदला आहे.
विश्वास पूर्णपणे रसातळाला
"हे युद्ध आज ना उद्या संपेल, पण इराणने जो विश्वासघात केला आहे, तो विसरणे कठीण आहे," असे प्रिन्स फैसल यांनी नमूद केले. इराण गेल्या दशकापासून शेजारील देशांना वेठीस धरून आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्याची खेळी खेळत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. इराणच्या या वागण्यामुळे भविष्यात संबंध सामान्य होणे आता अशक्य असल्याचे चित्र दिसत आहे.
Web Summary : Saudi Arabia issued a stern warning to Iran, citing intolerable missile and drone attacks on energy centers. Prince Faisal condemned Iran's actions and warned of a strong response, raising fears of a wider conflict in the Gulf.
Web Summary : सऊदी अरब ने ऊर्जा केंद्रों पर मिसाइल और ड्रोन हमलों के बाद ईरान को कड़ी चेतावनी दी। प्रिंस फैसल ने ईरान की हरकतों की निंदा की और कड़ी प्रतिक्रिया की चेतावनी दी, जिससे खाड़ी में एक बड़े संघर्ष का खतरा बढ़ गया।