बगदाद : मंत्रिमंडळाने आपणास अमर्यादित अधिकार बहाल केल्याचे इराकच्या पंतप्रधानांनी घोषित केल्यानंतर इराकी सुरक्षा दलांनी बंडखोरांविरुद्ध जोरदार मोहीम सुरू करत उत्तरेकडील एक शहर पुन्हा ताब्यात घेतले आहे. लष्करी दले आणि आदिवासी खासगी सुरक्षा दलांनी सलाहेद्दीन प्रांतातील इशाक्वी हे शहर पुन्हा ताब्यात घेतले. तेव्हा त्यांना शहरात १२ पोलीस कर्मचाऱ्यांचे जळालेले मृतदेह दिसून आले. सुरक्षा दलांनी नजीकच्या मुआतस्साम भागावरही नियंत्रण मिळविले आहे. याच प्रांतातील धुलुईयाह शहरावरही बंडखोरांनी कब्जा केला होता. मात्र, स्थानिक नागरिकांनी आक्रमक होत त्यांना पिटाळून लावले. स्थानिक नागरिक आता हवेत गोळीबार करून विजयाचा आनंद साजरा करत आहेत, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. सुरक्षा दलांनी दियाला प्रांतातील मुकदादीयाह भागातही त्वरेने शिरकाव केला. त्यामुळे दहशतवाद्यांना या भागातील शहर ताब्यात घेता येऊ शकले नाही. दरम्यान, सरकारकडून नागरिकानांही शस्त्रे पुरविण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)
इराकी सुरक्षा दलाचा एका शहरावर पुन्हा ताबा
By admin | Updated: June 15, 2014 03:01 IST