एकीकडे अमेरिकेसोबत अणु करारासंदर्भात चर्चासुरू असतानाच इराणनेचीन सोबत बॅलिस्टिक मिसाइल्ससंदर्भात मोठी डील अथवा करार केला आहे. यासंदर्भात अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका वृत्तानुसार, इराणने आपली सैन्य क्षमता वाढविण्याचा एक भाग म्हणून चीनकडून हजारो टन बॅलिस्टिक क्षेपणास्त्र साहित्य मागवले आहे. महत्वाचे म्हणजे, इराणने ऑर्डर केलेल्या क्षेपणास्त्र साहित्याचा पुरवठा केला गेला तर यापासून ८०० बॅलिस्टिक मिसाइल्स तयार होऊ शकतात, असे संबंधित वृत्तात म्हणण्यात आले आहे.
संबंधित वृत्तानुसार, चीन आगामी काही महिन्यांतच इराणलाला या खेपेचा पुरवठा करेल. या ऑर्डरमध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसाठी वापरल्या जाणाऱ्या घन इंधनाचा एक प्रमुख घटक असलेल्या अमोनियम परक्लोरेटचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या साहित्यातून 800 क्षेपणास्त्रांना इंधन मिळू शकते.
मिलिशिया समूहालाही देणार इंधन? -संबंधित वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, काही अमोनियम परक्लोरेट इराणसोबत युती करणाऱ्या मिलिशिया समूहांनाही पाठवले जाऊ शकते. या मिलिशिया समूहात यमनच्या हूती बंडखोरांचाही समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, या निर्णयामुळे इराणला त्याचा प्रादेशिक प्रभाव मजबूत करण्यास आणि त्याचे क्षेपणास्त्र शस्त्रागार बळकट होण्यास मदत होईल, असे मानले जात आहे.