Iran Port Blast Explosion: इराणच्या शाहिद राजाई बंदरात झालेल्या स्फोटामुळे आग लागली होती. ही आग अखेर शमली असल्याची माहिती मिळाली आहे. पण या अपघातातील मृतांची संख्या सतत वाढत आहे. सोमवारी मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढून ६५ एवढी झाली आहे. तर १ हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. अद्याप या स्फोटामागील कारण स्पष्ट झालेले नाही. इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी रविवारी सांगितले की, स्फोटांची चौकशी करण्यासाठी आणि त्यांचे निष्कर्ष काढण्यासाठी राजाई बंदराला भेट देण्याचे काम अनेक संसदीय समित्यांना देण्यात आले आहे.
शाहिद राजाई इराणचे महत्त्वाचे बंदर
तेल उत्पादनांच्या व्यापार आणि वाहतुकीत शाहिद राजाई बंदर महत्त्वाची भूमिका बजावते. या मोठ्या अपघातानंतर, होर्मोज्गानच्या राज्यपालांनी देशात तीन दिवसांचा सार्वजनिक शोक जाहीर केला आहे. स्फोट इतका भयानक होता की लागल्या आगीने संपूर्ण बंदर वेढले गेले. घटनेची माहिती मिळताच हेलिकॉप्टरमधून पाणी फवारण्यात आले, त्यानंतर खूप प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली गेली.
रासायनिक माल स्वीकारण्यास नकार
दरम्यान, एम्ब्रे या खाजगी सुरक्षा फर्मने म्हटले आहे की मार्चमध्ये सोडियम परक्लोरेट रॉकेट इंधनाचा एक माल बंदरावर आला होता. हे इंधन चीनमधून दोन जहाजांनी इराणला पाठवलेल्या मालाचा एक भाग होते. गाझा पट्टीत हमासशी झालेल्या युद्धादरम्यान इस्रायली हल्ल्यांमुळे इराणचा क्षेपणास्त्र साठा संपुष्टात आला होता. त्यामुळे या इंधनाचा वापर केला जाणार होता. इंधनाच्या शिपमेंटच्या चुकीच्या साठवणुकीमुळे हा अपघात झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. तथापि, इराणी सैन्याने रासायनिक माल मिळाल्याचा इन्कार केला आहे.