दुबई/तेहरान/नवी दिल्ली : मध्यपूर्वेतील संघर्ष झपाट्याने विस्तारत असून इराण–इस्रायल तणावाने आता संपूर्ण आखाताला वेढा घातला आहे. तेहरान, लेबनॉन, आखाती देश आणि हॉर्मुझ सामुद्रधुनीपर्यंत युद्धाची छाया पसरली आहे. ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले आणि क्षेपणास्त्र माऱ्यांमुळे जागतिक तेलपुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. त्याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या दरांवर दिसून येत असून जागतिक शेअर बाजारात घसरण नोंदवली गेली आहे. संघर्ष थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर हालचाली सुरू असल्या तरी रणांगणावरील कारवाया अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे.
संयुक्त अरब अमिरातीवर १८६ क्षेपणास्त्र प्रक्षेपित झाल्याची अधिकृत माहिती समोर आली असून ३ जणांचा मृत्यू आणि ६८ जखमी झाल्याचे सांगण्यात आले. लेबनॉनमध्ये दोन दिवसांत ४० जणांचा मृत्यू, २४६ जखमी झाल्याची नोंद आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीतून दररोज सुमारे २० दशलक्ष बॅरल तेलाची वाहतूक होते; या मार्गावरील तणावामुळे ब्रेंट कच्च्या तेलाचा दर ८० डॉलरच्या पुढे गेला. अमेरिकन बाजारात डाऊ जोन्स १.७ टक्के आणि नॅस्डॅक २ टक्क्यांनी घसरला. पर्यटन आणि गुंतवणूक क्षेत्रालाही अब्जावधी डॉलरचा फटका बसण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दोन दिवसांत भारतीय समुदायाच्या लोकांच्या सुरक्षेबाबत संयुक्त अरब अमिरात, इस्रायल, सौदी अरेबिया, जॉर्डन, बहरीन, ओमान, कुवेत आणि कतार या आठ देशांच्या प्रमुखांशी संवाद साधला. कतारचे अमीर शेख तमीम बिन हमदल थाने यांच्याशी संवाद साधताना त्यांनी कतारवरील हल्ल्यांचा निषेध केला. दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा यूएईमधून ४ विमाने दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि बेंगळुरूला पोहोचली. दुबई आणि अबुधाबीतून आतापर्यंत दाेन हजाराहून अधिक भारतीय मायदेशी परतले आहेत.
देशात सध्याच इंधन भाववाढ नाहीओमान आणि इराण दरम्यानचा स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा मार्ग बंद करण्याची घोषणा इराणने केली आहे. इराणच्या सैन्याने इशारा दिला आहे की, या मार्गातून कोणतेही जहाज गेल्यास त्याला आग लावली जाईल. त्यामुळे भारतासह आशियाई देशांच्या तेल पुरवठ्यावर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीही १०० डॉलर प्रति बॅरलच्या पुढे जाऊ शकतात. सध्या ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे ५.५८% वाढून ८०.४१ डॉलर प्रति बॅरलच्या आसपास पोहोचली आहे. भारताकडे सध्या २५ दिवस पुरेल इतका तेलसाठा असून लगेच पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होणार नसल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
हल्ला-प्रतिहल्ल्यांचे सत्र इस्रायल आणि अमेरिकेने इराणवरील हल्ले तीव्र केले आहे. इराणी सरकारी प्रसारमाध्यम केंद्रावरही प्रहार करण्यात आला आहे. इस्रायलने लेबनॉनमध्ये हवाई हल्ले वाढवून दक्षिण भागात जमिनीवरील कारवाई सुरू केली. रियाधाच्या अमेरिकन दूतावासावर दोन ड्रोन आदळल्याची पुष्टी सौदी प्रशासनाने केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही मोहीम सुमारे चार आठवडे चालू शकते असे सांगत तेहरानची क्षेपणास्त्र आणि अणुक्षमता नष्ट करण्याचा निर्धार व्यक्त केला. खामेनेई यांचे प्रतिनिधी डॉ. अब्दुल माजीद हकीम इलाही यांनी इराण सन्मानाने वाटाघाटी करण्यास तयार असल्याचे म्हटल्याचे वृत्त आहे; मात्र ट्रम्प यांनी वाटाघाटींना नकार देत “आता उशीर झाला” असे स्पष्ट केले आहे.
Web Summary : Middle East conflict intensifies, impacting global oil supply and markets. Attacks on energy facilities trigger price hikes and stock market declines. International efforts to de-escalate continue as tensions rise. India monitors safety of its citizens.
Web Summary : मध्य पूर्व में संघर्ष तेज, वैश्विक तेल आपूर्ति और बाजारों पर असर। ऊर्जा सुविधाओं पर हमलों से कीमतों में वृद्धि और शेयर बाजार में गिरावट आई। तनाव बढ़ने के साथ अंतरराष्ट्रीय स्तर पर शांत करने के प्रयास जारी हैं। भारत अपने नागरिकों की सुरक्षा पर नजर रख रहा है।