लोकमत न्यूज नेटवर्ककट्टर इस्लामीक देश म्हणून इराण ओळखला जातो. संपूर्ण जग कोरोनाशी झुंजत असताना इराणलाही आपल्या अपुर्या आरोग्य सुविधांसह कोरोनाशी लढा द्यावा लागतो आहे. जगात सगळ्यांत जास्त ज्या देशांत कोरोनानं हाहाकार माजवला त्या प्रमुख देशांत इराणचा सध्या आठवा क्रमांक लागतो. त्यांच्याकडे आतापर्यंत 84 हजार 802 कोरोनाचे रुग्ण सापडले असून त्यातील 5297 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 60,965 लोक बरे होऊन घरी गेले आहेत, असा इराणचा दावा आहे. इराण आणि अमेरिका यांचे संबंध आधीच ताणलेले आहेत. आपल्या देशांतर्गत समस्यांनी इराण आधीच त्रस्त आहे. त्यात कोरोनानं त्यांच्याकडे उच्छाद मांडला आहे. मृत्यूमुखी पडणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. विज्ञानापेक्षाही पारंपरिकतेकडे इराणचा अधिक ओढा आहे. अशा काळात विज्ञानाच्या मदतीनं त्यांनाही आशेचा किरण दिसला आहे. इराणनं नुकताच दावा केला आहे, की कोणाकडूनही आम्हाला मदत मिळत नसली, तरी काय झालं, आम्ही कुठल्याही संकटांना तोंड देण्यास आणि कुठल्याही आपत्तींचा धैर्यानं मुकाबला करण्यास सज्ज आहोत. इराणचे कमांडर इन चिफ हुसेन सलामी यांनी नुकताच असा दावा केला आहे, की आम्ही नुकतेच एक उपकरण तयार केले आहे. त्यामुळे तब्बल शंभर मीटर परीघातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शोधून काढता येईल. हे यंत्र आपल्याभोवती चुंबकीय लहरी निर्माण करतं आणि त्यामुळे शंभर मीटर परीघातील कोरोना व्हायरसनं संक्रमित असलेलं कोणतंही क्षेत्र शोधता येऊ शकतं. या प्रकियेला केवळ पाच सेकंदा लागतात, असाही त्यांचा दावा आहे. ‘आयआरजीसी’ (इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स) आणि त्याचे प्रमुख हुसेन सलामी यांचं म्हणणं आहे, हे यंत्र दूर अंतरावरुन, दुरस्थपणे कार्यरत होत असले, तरी त्याची अचूकता 80 टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. आम्ही या यंत्राची बर्याच ठिकाणी चाचणी घेतली आहे आणि ते परिणामकारक सिद्ध झाले आहे. दाट वस्तीच्या ठिकाणी या यंत्राचा खूपच चांगला उपयोग होणार आहे. हे उपकरण स्मार्ट जंतुनाशक म्हणून तर काम करेलच, पण कोणत्या भागात मोठय़ा प्रमाणात जंतुनाशक फवारणीची गरज आहे, हेदेखील त्यामुळे कळेल. केवळ कोरोनाच नव्हे, इतर कोणत्याही विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी या उपकरणाचा उपयोग होऊ शकेल असा दावाही आयआरजीसीनं केला आहे. मोठा गाजावाजा करून या उपकरणाचं अनावरण करण्यात आलं असलं तरी हे उपकरण कितपत उपयोगी आहे, याबाबत मात्र शंका व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावरही यावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.खुद्द इराणमधील काही नागरिकांनीही यावर शंका व्यक्त केली असून इराणच्या या दाव्यावर ‘हसावं कि रडावं’ असा प्रo्न आम्हाला पडला आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे.
प्रत्येक रुग्णाला शोधू!- इराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 13:14 IST
इराणचे कमांडर इन चिफ हुसेन सलामी यांनी नुकताच असा दावा केला आहे, की आम्ही नुकतेच एक उपकरण तयार केले आहे. त्यामुळे तब्बल शंभर मीटर परीघातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शोधून काढता येईल.
प्रत्येक रुग्णाला शोधू!- इराण
ठळक मुद्देइराणनं तयार केलंय रुग्ण शोधणारं उपकरण!