पश्चिम आशियातील युद्धाचा भडका आता जागतिक अर्थव्यवस्थेच्या मुळावर उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुजच्या सामुद्रधुनीवर इराणने आपली पकड घट्ट केली असून, गेल्या २४ तासांत केवळ १५ जहाजांनाच या मार्गावरून जाण्याची परवानगी दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट धमकी दिली असून, मंगळवारपर्यंत हा मार्ग मोकळा न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याचा इशारा दिला आहे.
वाहतूक ९० टक्क्यांनी घटली
गेल्या २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यानंतर या परिसरातील तणाव शिगेला पोहोचला आहे. या हल्ल्यांनंतर होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होणारी जहाजांची वर्दळ तब्बल ९० टक्क्यांनी घटली आहे. इराणच्या विशेष परवानगीशिवाय कोणत्याही जहाजाला पुढे सरकता येत नाहीये. इराणच्या फार्स न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, इराणचे अधिकारी प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. जगातल्या एकूण तेल व्यापारापैकी २० ते २५ टक्के वाटा याच मार्गावरून जातो, त्यामुळे इराणच्या या आडमुठ्या धोरणामुळे जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर भडकण्याची भीती व्यक्त होत आहे.
ट्रम्प यांचा पावर प्लांट आणि ब्रिज डेचा इशारा
दुसरीकडे, अमेरिकेने या नाकेबंदीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत इराणला उघड इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी लिहिले की, "मंगळवार हा पावर प्लांट आणि ब्रिज डे असेल. जे आधी कधीही पाहिले नसेल, असे काहीतरी घडेल. होर्मुजची सामुद्रधुनी तात्काळ उघडा, अन्यथा परिणामांना तयार राहा." इतकेच नव्हे तर त्यांनी मंगळवारी रात्री ८ वाजता अशी वेळही निश्चित केली आहे, ज्यामुळे आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत.
खामेनी यांच्या मृत्यूनंतर परिस्थिती चिघळली
२८ फेब्रुवारीच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. या हल्ल्यात आतापर्यंत १३४० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचाच बदला म्हणून इराणने इस्रायलसह जॉर्डन, इराक आणि आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वर्षाव सुरू ठेवला आहे. आता होर्मुजचा मार्ग रोखून इराणने अमेरिकेच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Web Summary : Iran restricts Hormuz Strait access, impacting global oil trade. Trump threatens action if the strait isn't reopened by Tuesday, escalating tensions following attacks and Khamenei's reported death.
Web Summary : ईरान ने होर्मुज जलडमरूमध्य में प्रवेश प्रतिबंधित किया, जिससे वैश्विक तेल व्यापार प्रभावित हुआ। ट्रम्प ने मंगलवार तक जलडमरूमध्य को फिर से खोलने की धमकी दी, हमलों और खामेनी की कथित मौत के बाद तनाव बढ़ गया।