USA Hanuman Statue: अमेरिकेतील एका रिपब्लिकन नेत्याने हनुमानाच्या ९० फूट उंच मूर्तीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. ही मूर्ती 'स्टॅच्यू ऑफ युनियन' म्हणून ओळखले जाते. टेक्सासचे रिपब्लिकन नेते अलेक्झांडर डंकन यांनी अमेरिकेला ख्रिस्ती राष्ट्र म्हणत, हिंदू देवता हनुमानाच्या मूर्ती उभारणीवर आक्षेप घेतला.
"आपण एका खोट्या हिंदू देवतेची मूर्ती टेक्सासमध्ये का उभारू देत आहोत? आपण एक ख्रिस्ती राष्ट्र आहोत," असे डंकन यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले. त्यांनी यासोबत टेक्सासच्या शुगर लँड शहरातील श्री अष्टलक्ष्मी मंदिरातील मूर्तीचा व्हिडिओही जोडला होता.
दुसऱ्या एका पोस्टमध्ये, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचे नेते डंकन यांनी बायबलमधील वचनाचा संदर्भ दिला. त्यांनी लिहिले, "माझ्या व्यतिरिक्त तुमचा दुसरा कोणताही देव नसावा. तुम्ही स्वतःसाठी आकाशात, पृथ्वीवर किंवा समुद्रात कोणत्याही प्रकारची मूर्ती किंवा प्रतिमा बनवू नये."
यावर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली
डंकन यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. 'हिंदू अमेरिकन फाउंडेशन' (HAF) या संस्थेने हे वक्तव्य "हिंदूविरोधी आणि चिथावणीखोर" असल्याचे म्हटले आहे. या संस्थेने टेक्सासच्या रिपब्लिकन पक्षाकडे या घटनेची औपचारिक तक्रार केली असून, यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
'हिंदू अमेरिकन फाउंडेशन'ने 'एक्स'वर पोस्ट करून म्हटले की, "@TexasGOP, तुमच्या पक्षाच्या अशा उमेदवारावर तुम्ही कारवाई करणार आहात का, जो खुलेआम भेदभावविरोधी नियमांचे उल्लंघन करत आहे? हे हिंदूविरोधी द्वेष दाखवते आणि पहिल्या घटनादुरुस्तीतील (First Amendment) एस्टॅब्लिशमेंट क्लॉजचाही अनादर आहे."
अनेक नेटिझन्सनीही या रिपब्लिकन नेत्याला आठवण करून दिली की अमेरिकेचे संविधान नागरिकांना कोणताही धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य देते.
जॉर्डन क्रॉउडर नावाच्या एका 'एक्स' वापरकर्त्याने लिहिले, "तुम्ही हिंदू नाही म्हणून याचा अर्थ दुसऱ्या धर्माच्या देवतेला तुम्ही खोटे ठरवू शकत नाही. वेदांसारखे ग्रंथ येशूच्या जन्माच्या २००० वर्षांपूर्वीच लिहिले गेले होते. तुमच्या धर्माच्या आधी अस्तित्वात असलेल्या आणि त्याचा प्रभाव असलेल्या 'धर्माचा' सन्मान करणे आणि त्याबद्दल संशोधन करणे शहाणपणाचे ठरेल."
'स्टॅच्यू ऑफ युनियन' बद्दल
२०२४ मध्ये अनावरण झालेली 'स्टॅच्यू ऑफ युनियन' ही अमेरिकेतील सर्वात उंच हिंदू स्मारकांपैकी एक आहे. श्री चिन्ना जीयर स्वामीजी यांची ही कल्पना होती आणि ही अमेरिकेतील तिसरी सर्वात उंच मूर्ती आहे.