पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावलं उचलली आहेत. सुरुवातीला मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानने पोसलेले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. सुमारे तीन दिवस चाललेल्या या संघर्षानंतर दोन्ही देशांनी युद्धविराम घोषित केला. मात्र भारताने पाकिस्तानविरोधात घेतलेले काही निर्णय कायम ठेवले आहे. त्यापैकी सिंधू पाणी करारही भारताने स्थगित ठेवलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं असून, भारताने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती करणारं पत्र पाकिस्तानने भारताला पाठवलं आहे.
पाकिस्तानच्या जलसंपत्ती मंत्रालयाचे सचिव सय्यद अली मुर्तुजा यांनी भारताच्या जलशक्ती मंत्रालयाच्या सचिवांना हे पत्र पाठवलं आहे. तसेच या विषयी चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. पाण्यासारख्या संवेदनशील विषयावर घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा, अशी विनंती पाकिस्तानने भारताला केली आहे.
पाकिस्तानने सांगितले की, भारताने तीन नद्यांच्या पाण्यावरील आपल्या अधिकारांचा पूर्ण वापर सुरू केला, तर पाकिस्तानच्या अनेक राज्यांमध्ये गंभीर जलसंकट निर्माण होईल. दरम्यान, याचाच विचार करून पाकिस्तानने भारताला चर्चेचं आवाहन केलं आहे. मात्र भारताकडून या विषयी अद्याप कुठलीही मवाळ भूमिका घेण्यात आलेली नाही.
सूत्रांनी सांगितले की, भारत सरकारने पाकिस्तानच्या विनंतीला अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लीच देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे या मुद्द्यावर पाकिस्तानला दिलासा देणारा कुठलाही निर्णय भारताकडून सध्यातरी होण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे.