मध्य पेनसिल्व्हानियामधील एका रुग्णालयात हादरवून टाकणारी घटना घडली. एका हल्लेखोराने रुग्णालयात घुसून रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या चकमकीत एका सुरक्षा अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. तर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हल्लेखोरही ठार झाला. शनिवारी ही घटना घडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यूपीएमसी मेमोरियलने या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेत कोणत्याही रुग्णाला इजा झाली नसून, सर्व रुग्ण सुरक्षित आहेत. हल्लेखोराचा मृत्यू झाला असून, इतर जखमींबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही, असे मेमोरियलच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
हल्लेखोर थेट आयसीयूमध्ये घुसला
माहितीनुसार, हल्लेखोर रुग्णालयात शिरला. तो थेट अतिदक्षता विभागात घुसला आणि त्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले.
यॉर्क काऊंटीचे अॅटर्नी टीम बार्कर यांनी सांगितले की, हा व्यक्ती युपीएमसी मेमोरियल रुग्णालयात हॅण्डगनसह रुग्णालयात शिरला होता. तो आयसीयू विभागात घुसला. त्यानंतर त्याने गोळीबार केला. त्यानंतर त्याने एक डॉक्टर, नर्स आणि आयसीयूतील कर्मचाऱ्यासह तिघांना ओलीस ठेवले.
सुरक्षा अधिकाऱ्याचा मृत्यू
दरम्यान, हल्लेखोराने रुग्णालयात शिरल्यानंतर गोळीबार केल्यानंतर सुरक्षा जवान सर्तक झाले. त्यांनी हल्लेखोरांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी झालेल्या चकमकीत एका सुरक्षा जवानाचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. त्यानंतर पोलिसांच्या गोळीबारात हल्लेखाराचाही मृत्यू झाला.
सुदैवाने या घटनेत कोणत्याही रुग्णाला किंवा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना इजा झाली नाही, असे युपीएमसीच्या जनसंपर्क विभागाचे उपाध्यक्ष सुसान मन्को यांनी सांगितले.