शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

अमेरिकेतील भारतीयांची दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 18:02 IST

दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण. आम्ही अनिवासी भारतीय आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न जरा जास्तच करतो आणि त्याच प्रयत्नांत कोणताही सण येथे दुप्पट उत्साहाने साजरा केला जातो

ठळक मुद्देयेथे जन्मलेली, वाढलेली मुलं  are enjoying best of both worlds असं मला वाटतआपले सण, परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावे म्हणून आई-वडील जो प्रयत्न करत आहेत त्याला यश नक्कीच मिळतंयअमेरिकेतल्या बऱ्याचशा शाळांमध्ये भारतीय पालकांच्या सहकार्याने दिवाळी साजरी होतेय

- रेणुका इनामदार, बे एरिया, कॅलिफोर्निया

मांगल्याचे क्षण उधळीत आली हसरी दिवाळीआनंदाचे कण वेचीत नाचू गाऊया मंडळीप्रकाशु दे आसमंत सौजन्याची पणती सोनसळीसुखी समृद्धी जीवनात लाभो तेजाची झळाळीदिवाळी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण. आम्ही अनिवासी भारतीय आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न जरा जास्तच करतो आणि त्याच प्रयत्नांत कोणताही सण येथे दुप्पट उत्साहाने साजरा केला जातो. बघा ना, इथे आजकाल गणपती फक्त मराठी लोकांच्याच घरी येत नाही, तर सर्वधर्मीय सर्व प्रांतीय भारतीयाच्या घरी आनंदात विराजमान झालेला दिसतो. करवाचौथही दक्षिण भारतीय बायकांपर्यंत पोहोचलाय, तर गोलू उत्तर भारतीय बायकांपर्यंत आणि गरबा-दांडिया तर गुजराथी लोकांची मक्तेदारी न राहता खºया अर्थाने ग्लोबल झालाय. मग दिवाळी तर अहो सर्व सणांचा राजा. जसे भारतात दिवाळीचे वेध लागतात तसेच येथेही ते सगळ्यांना २-३ महिने आधीपासूनच लागतात. एक तर सगळे सेलिब्रेशन्स शनिवार-रविवार. मग दिवाळी पार्टी करायची असेल तर आमंत्रण देऊन मित्र-मैत्रिणींची तारीख बुक (save the date) करून ठेवावी लागते. मित्र-मैत्रिणींची यादी तयार होऊन दिवाळी पार्टीचे आमंत्रण पाठवले की, मग घर कसे सजवायचे, फराळाचे पदार्थ कुठले घरी करता येतील आणि कुठले भारतातून मागवता येतील, जेवणाचा बेत काय करायचा, नवºयाकडे आणि मुलांकडे नवीन कपडे काय आहेत, ठेवणीतील साडी नेसायची की, नवीन घ्यायची याची डोक्यात जुळवणी सुरू व्हायला लागते.

दिवाळीमध्ये पार्टी हॉपिंग हा एक नवीन वाक्प्रचार ऐकायला येतो. म्हणजे ३०-४० मैल रेडियसमध्ये ड्राईव्ह करायला तसे फारसे काही वाटत नाही. मग सॅन होजे ते सॅन रमॉन किंवा फ्रीमाँट ते कुपटिर्नी येथे दिवसात ३-४ पार्टींना आरामात जाता येते. प्रत्येकजणाकडची दिवाळी पार्टी वेगळी, कल्पकतेने केलेली घरातली दिव्यांची सजावट, रांगोळी, घरी बनवलेले आकाशकंदील, खाण्यापिण्याची रेलचेल असली तरी फराळ, केलेले जेवण मांडून ठेवण्याला, प्रेझेंटेशनला पण महत्त्व दिले जातंय. व्यस्त कामातून रोजच्या रूटीनमध्ये भेटायला फुरसत मिळाली नाही, तर या निमित्ताने वर्षातून एकदा मित्रमंडळींना भेटणे होते. भेटीगाठी होतातच त्याचबरोबर त्या घराच्या गृहिणीची किंवा यजमानांची काही खासियत असेल तर मग खाण्याची मेजवानी, सुरांची मैफील किंवा जिव्हाळ्याच्या गप्पा देखील पुरेशा होतात.

दिवाळीची म्हणून खरेदी देखील एकदम जोरदार. प्रत्येक उत्सवात किंवा इव्हेंटमध्ये स्टॉल्सवर जाऊन भारतातल्यासारखे घासाघीस करून खरेदी केली की अगदी धन्य. स्पेशली साड्या आणि दागिने बायकांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे त्या सगळ्या स्टॉल्सवर खच्चून गर्दी. त्या मानाने मुलांचे आणि पुरुषांचे कपडे स्टॉल्स कमी दिसतात (कदाचित फोटो काढून मिरवणे कमी असते की काय म्हणून). तुम्ही म्हणाल त्या प्रकारचा ड्रेस, भारतात चालू असलेली लेटेस्ट फॅशनची साडी टसर, कलमकारी, कांजीवरम्, बनारस ते आपली पैठणी, पाहिजे ती साडी घेऊन दिवाळीला मिरवू शकाल एवढी दुकाने आहेत. दिवाळीच्या आधीचे काही दिवस दिवाळी सेल म्हणून दुकानदारांची जाहिरातबाजी चालू असते, त्यात आॅनलाईन शॉपिंग; पण मग काय मज्जाच मज्जा.

भारतीय ज्वेलर्स देखील खास दिवाळीनिमित्त भरपूर सूट देतात. मागच्या काही वर्षांत पीएनजीने येथे दोन दुकाने उघडली आणि दिवाळीच्या दिवसात दोन्हीही ओसंडून वाहत असतात. जरा उशिरा गेलात तर इथल्या सेल्सगर्ल्स सांगणार ‘अगं जरा आधी यायचं नाहीस का, खूप छान छान सिलेक्शन्स होती बघ’. बायका कुठेही गेल्या तरी त्यांचे सोने, हिरे, दागिने खरेदीचे वेड काही सुटत नाही. मेसीज, ब्लूमिंगडेल्स, टारगेट ही प्रसिद्ध डिपार्टमेंटल स्टोअर्स देखील थँक्सगिविंग आणि ख्रिसमससारख्या दिवाळी सेलच्या जाहिराती द्यायला लागतील हे चित्र काही फार दूर नाही. BART (local railway), local buses यावरती तर हसरे भारतीय कुटुंब आणि शुभ दीपावलीसारखे संदेश दिसतातच. USPS अमेरिकन टपाल खात्याने दिवाळी टपाल तिकीट जारी केलंय. इतकेच नाही तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून देखील भारतीयांसाठी दिवाळीच्या शुभेच्छा येतात. सॅन फ्रान्सिस्को, लॉस अँजेलिस, न्यू जर्सी, शिकागो किंवा ह्युस्टनसारख्या शहरात राहात असाल तर सण आणि सेलिब्रेशन्स दणक्यात होतात. सार्वजनिक गणपतीपासून देवीचे नवरात्र मग दिवाळी, थँक्सगिविंग, ख्रिसमस ते नवीन वर्ष, असे ४-५ महिने खूपच धमाल येते.

येथे जन्मलेली, वाढलेली मुलं  are enjoying best of both worlds असं मला वाटत. आपले सण, परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावे म्हणून आई-वडील जो प्रयत्न करत आहेत त्याला यश नक्कीच मिळतंय. अमेरिकेतल्या बऱ्याचशा शाळांमध्ये भारतीय पालकांच्या सहकार्याने दिवाळी साजरी होतेय. भारतीय कपडे घातलेला मुलगा, परकर-पोलकं घातलेली मुलगी, कपाळावर टिकली, हातात बांगड्या किंवा साडी घातलेली बाई अशा सगळ्याला इथल्या लोकांच्या नजराही आता सरावल्या आहेत. मुलांच्या शाळेत युनिफॉर्म नाही. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी भारतीय पेहराव घालून मुलं शाळेत गेली तर कौतुकच होते. दिवाळी म्हणजे काय हे मुलांच्या प्राथमिक शाळेत जेव्हा मी सादर केलं तेव्हा सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे दिवाळी हा थँक्सगिविंग आणि ख्रिसमस एकत्र करून साजरा केलेला सण. सिलिकॉन व्हॅलीतल्या बऱ्याचशा कंपन्यांमध्ये ‘दिवाळी सेलिब्रेशन्स’ धुमधडाक्यात साजरे होते. अशा कार्यक्रमांमध्ये दिवाळी प्रेझेंटेशन देत असताना इतर लोकांनी दिवाळीबद्दलचे विचारलेले प्रश्न आणि त्याची उत्तरे देताना मलादेखील दिवाळीबद्दल काही गोष्टी नव्यानेच उमगल्या.

बे एरियातील ५०+ मंदिरांमध्ये दिवाळीचे भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम असतात. गायन, वादन, नृत्य या कला आमची ABCD मुले (American Born Cultured Desi Kids) अतिशय सुंदर आणि अभिमानाने सादर करतात. मंदिरांची रोषणाई, देवांच्या सजवलेल्या मूर्ती बघण्यासारख्या असतात. देवाच्या दर्शनाला आलेले, उत्साहित आणि छान नटलेले आनंदी लोक या वातावरणात कोणालाही नक्कीच खूप प्रसन्न वाटेल. या सगळया मंदिरांची एक गंमत आहे मात्र. कोणताही पूजा किंवा शुभ दिवस आणि पूजा करण्याची वेळ प्रत्येक मंदिराची वेगळी. पूजा करायची ती भारतीय वेळेनुसार की अमेरिकन हा एक मोठा प्रश्न सामान्य माणसाला. त्यात या मंदिरांकडून वेगवेगळे दिवस आणि वेळ जाहीर झाली की, गोंधळात पडलेले लोक अजूनच गोंधळात पडतात.

‘आत्ताचा जमाना वेगळा आहे हो. आम्ही पूर्वी असं करायचो तस करायचो’ हे म्हणण्याइतपत मी येथे मुरलीय. मग यात कॉर्न फ्लेक्सचा चिवडा, बेसन लाडूला जरा भरडं पीठ लागत म्हणून घरच्या मिक्सरवर डाळ दळून घेणे, पेस्ट्री स्ट्रिप्सपासून चिरोटे बनवणे, आईला दहावेळेला फोन करून रेसिपी विचारणं, काही अडेलच तर आपल्याही आधी येथे आलेल्या अनुभवी मैत्रिणींचा सल्ला घेणे, पार्टीच्या आधी मदत करायला आलेल्या मित्राला केलेली पहिलीच गरमगरम चकली खायला दिल्यानंतर त्याचा प्रेक्षणीय झालेला चेहरा, अन्नपूर्णा किंवा रुचिरामधली रेसिपी जशीच्या तशी करून देखील खास लक्ष्मी पूजनाकरिता करायला घेतलेला अनारस फसला तेव्हा कोसळलेले रडू आणि नवऱ्याने हसत हसत घातलेली समजूत असो की, २-४ मैत्रिणी मिळून फराळ बनवण्याची गंमत अशा आयुष्यभराच्या सुंदर आठवणी या दिवाळीने दिल्या आहेत.

गेल्या काही वर्षांत तयार केलेला आयता फराळ भारतातून मागवायची सोय झाली आहे. त्यामुळे चिवडा, चकली, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, करंज्या आणि चिरोटे, अनारसेसारखे काही खास पदार्थ मनसोक्त खाऊ शकता आणि मित्र- मैत्रिणींना देखील बिनदिक्कत खायला घालू शकता.भारतात दिवाळी साजरी करून १६ वर्षे झाली. त्यानंतर पुन्हा जायला जमलेच नाही. भारतातल्या दिवाळीच्या आठवणी इतक्या आहेत. मला वाटतं, थोड्या फार फरकाने सगळ्यांच्या अशाच असणार. नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी उठून अंघोळ, मग बाहेर रस्त्यावरती वाजवलेले फटाके, भावांनी सुतळी बॉम्ब लावल्यानंतर कान बंद करत घरात ठोकलेली धूम, पहाटे पहाटे खालेल्ला फराळ, आई चकली तळत असतानाचा तो वास, आजीचे लाडू एवढे सुबक गोल कसे होतात म्हणून एकटक तिच्या हाताकडे बघत बसायचं, पाडव्याला बाबांना आणि भाऊबिजेला भावांना ओवाळणे, आईची ओवाळणी सगळ्यात जास्त कशी म्हणून दर दिवाळीला बाबांकडून हट्ट करून भाऊबिजेच्या दिवशी दोन्ही भावांकरवी अजून मागून घेतलेली ओवाळणी आणि भरपूर वाचलेले दिवाळी अंक. सगळ्यात जास्त धमाल मात्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कारखान्यात, सगळीकडे फुलांच्या माळा, सुंदर तोरण आणि पूजेनंतर लवंगीची हजाराची लड, तो आवाज अजूनही कानात घुमतो. फटाके वाजवायला इथे बऱ्याच शहरात, काही राज्यांत बंदी आहे. प्रदूषण, आगीची भीती आणि लाकडाची घरे ही तीन मुख्य कारणे. त्यामुळे बिना आवाजाच्या दिवाळीची येथे सवय झाली असली तरी फटाक्यांची उणीव जाणवत नाही. ती मित्र-मैत्रिणीच्या आदरातिथ्याने, फराळ आणि खाद्यपदार्थांच्या स्वादाने, मुलांच्या हसण्याच्या गडगडाटाने आणि जिवलगांच्या प्रेमाने ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना खूप आनंदाची आणि समृद्धीची जावो, ही सदिच्छा.(लेखिका अमेरिकेत रेडिओ जॉकी आहेत.)

टॅग्स :diwaliदिवाळीUSअमेरिका