मेलबर्न : ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात एका ३३ वर्षीय भारतवंशीयावर काही किशोरवयीन मुलांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. सौरभ आनंद असे त्याचे नाव आहे. या प्राणघातक हल्ल्यात सौरभचा डावा हात मनगटाजवळ तुटला असून, शरीराला व मणक्याला गंभीर इजा झाली आहे. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन किशोरवयीन मुलांना अटक केली.
१९ जुलै रोजी मेलबर्नच्या अल्टोना मेडोज येथील सेंट्रल स्क्वेअर शॉपिंग सेंटरमधून औषधी घेऊन सौरभ बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर हल्ला झाला. काही किशोरवयीनांनी पाठीमागून हल्ला करत त्याला खाली पाडले व त्याच्याजवळचे साहित्य लुटण्याचा प्रयत्न केला. या झटापटीदरम्यान एका किशोरवयीन हल्लेखोराने धारदार चाकूने सौरभवर वार केले. या हल्ल्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी सौरभने डावा हात वर केल्यानंतर हल्लखोराने त्याच्या हातावर चाकूने अनेक वार केले. हल्ल्यात सौरभचा डावा हात जवळपास पूर्ण तुटला होता.
तुटलेला डावा हात जोडण्यात डॉक्टरांना यश
सौरभने आरडाओरड केल्यानंतर मदतीला धावून आलेल्या लोकांनी त्याची हल्लखोरांच्या तावडीतून सुटका करत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सौरभच्या खाद्यांवर व पाठीच्या मणक्यालादेखील गंभीर इजा झाली आहे. अनेक शस्त्रक्रियांनंतर मनगटाजवळ तुटलेला डावा हात जोडण्यात डॉक्टरांना यश आले आहे.