भारतपाकिस्तान वाद हा खूप मोठा आहे आणि तो भविष्यात कधीही मिटण्याची शक्यता फार कमी आहे. या दोन्ही देशांच्या नागरिकांत असलेले वाद परदेशात गेल्यावरही कायम आहेत. दुबईच्या एका टेकॉम भागात भारत आणि पाकिस्तानच्या दोन नागरिकांमध्ये पार्किंगवरून वाद झाला होता. हा वाद एवढा वाढला की पोलिसांना मध्ये पडत कारवाई करावी लागली होती. फेब्रुवारी २०२३ चा हा वाद असला तरी आता तो चर्चेत आला आहे, तो कोर्टाने दिलेल्या आदेशावरून.
या वादावर निर्णय देताना कोर्टाने पाकिस्तानी नागरिकाला दुबई सोडण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानी व्यक्ती हा ७० वर्षे वयाचा आहे, तर भारतीय नागरिक हा ३४ वर्षांचा आहे. हे दोघेही एकाच इमारतीत राहत होते. भारतीय नागरिक जिथे त्याची कार पार्क करत होता त्या जागेवर पाकिस्तानी नागरिकाने दावा केला होता. यावरून सुरु झालेल्या तू-तू मै-मैचे रुपांतर वादात झाले.
रागातून पाकिस्तानी नागरिकाने भारतीयाला ढकलले, यामुळे तो जमिनीवर पडला. भारतीयाने पोलिसांना बोलविले, त्यांनी गुन्हा दाखल केला. प्रकरण कोर्टात गेले आणि त्या पाकिस्तानी नागरिकालाच आता देश सोडावा लागत आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले होते. परंतू, भारतीय नागरिक जखमी होता व सर्व पुरावे त्याच्या बाजुने असल्याने त्याला सोडून देण्यात आले होते.
कोर्टातील सुनावणीत पाकिस्तानी नागरिकानेही भारतीय नागरिकाला धक्का मारल्याचे कबुल केले होते. परंतू, असे करण्यास भारतीय नागरिकाने आपल्याला भाग पाडल्याचा आरोप केला होता. न्यायालयाने सारासार विचार करून पाकिस्तानी नागरिकाला देशातून बाहेर काढले आहे.
एका व्यक्तीवर हल्ला करणे, त्याला कायमस्वरुपी विकलांग करण्याचा प्रयत्न करणे या गुन्ह्यात कोर्टाने आरोपीला तीन महिन्यांची शिक्षा केली, ही शिक्षा भोगून झाल्यावर त्याला देश सोडण्यास सांगितले आहे. भारतीय नागरिकावर त्याने लावलेले आरोप कमी तीव्रतेचे असून त्याच्यावरील पुढील कारवाईसाठी हे प्रकरण दुसरीकडे सोपविण्यात आले आहे.