Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. तसेच या निर्णयांवर भारत ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारत काय करू शकतो, याची एक चुणूक पाकिस्तानसह जगाला दाखवण्यात आली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ स्थगित केले आहे, संपलेले नाही, असेही भारताने स्पष्ट केले आहे. यातच आता पाकिस्तानात असलेल्या दहशतवाद्यांना भारताकडे सोपवावे, यासाठी भारताने आक्रमकपणे प्रयत्न सुरू केले आहेत. याचसंदर्भात भारताचे इस्रायलमधील राजदूत जेपी सिंह यांनी मांडलेले मत महत्त्वाचे मानले जात आहे.
पाकिस्तानने त्यांची विश्वसनीयता सिद्ध करण्यासाठी काही दहशतवाद्यांचे प्रत्यार्पण करावे, अशी आग्रही भूमिका भारत घेऊ शकतो, असे म्हटले जात आहे. हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम आणि इतर दहशतवादी पाकिस्तानात मोकाट फिरत आहेत. त्यांना भारताच्या ताब्यात देण्याची मागणी पाकिस्तानला करण्यात येणार आहे. हव्या असलेल्या या दहशतवाद्यांची यादी लवकरच पाकिस्तानला सोपविण्यात येणार आहे. भारताचे इस्रायलमधील राजदूत जेपी सिंह यांनी अमेरिकेचा दाखला देत पाकिस्तानला सुनावले आहे.
पाक सईद-लखवी भारताला का देऊ शकत नाही
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या तहव्वूर राणाचे अमेरिका भारताकडे प्रत्यार्पण करू शकते, तर मग पाकिस्तानने हाफिस सईद, साजिद मीर आणि जकीऊर रहमान लख्वी अशा दहशतवाद्यांना भारताकडे सोपवले पाहिजे. दहशतवाद्यांनी धर्माच्या आधारे लोकांना मारले. त्यांनी लोकांना मारण्यापूर्वी त्यांच्या धर्माबद्दल विचारले आणि २६ निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. भारताची मोहीम दहशतवादी गट आणि त्यांना पुरवल्या जात असलेल्या पायाभूत सुविधांविरुद्ध होती. परंतु, पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले, असे जेपी सिंह यांनी सांगितले. तसेच युद्धविराम सुरूच राहणार का आणि भारतासाठी शेवटचा असेल का? या प्रश्नाला उत्तर देताना जेपी सिंह म्हणाले, युद्धविराम अजूनही कायम आहे, परंतु आम्ही स्पष्ट केले आहे की ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्यात आले आहे, ते अजून संपलेले नाही. इस्रायलमधील एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जेपी सिंह बोलत होते.
दरम्यान, हाफिज सईद हा २००८ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आहे. मसूद अझहर हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख आहे. पुलवामा आणि इतर हल्ल्यांशी त्याचा संबंध आहे. तर, दाऊद इब्राहिम हा १९९३ चे मुंबई बॉम्बस्फोट आणि इतर गुन्ह्यांसाठी भारताला हवा आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्यात महत्त्वाचा सहभाग असलेला हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीनला २०१७ मध्ये अमेरिकेने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले. इंटरपोलने नोटीस जारी केली. तो उघडपणे पाकिस्तानात काम करतो.