Operation Sindoor, India Pakistan Conflict: ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानेपाकिस्तानी हल्ल्यांना इतके चोख प्रत्युत्तर दिले की पाकिस्तानला चांगलीच धडकी भरली आहे. त्याच वेळी, पाकिस्तानी नेत्यांना भारताकडून आणखी हल्ल्यांची भीती वाटू लागली आहे. युद्धविरामानंतरही पाकिस्तानी नेते म्हणत आहेत की भारत पुन्हा पाकिस्तानवर हल्ला करू शकतो. इतकेच नव्हे तर अशा विधानांवरून हे समजते की युद्धविरामानंतरही पाकिस्तानमध्ये भारताच्या कारवायांची भीती कायम आहे.
पाकिस्तानची वृत्तवाहिनी 'समा टीव्ही'च्या एका कार्यक्रमात, अवामी मुस्लिम लीग (एएमएल) चे प्रमुख आणि माजी मंत्री नदीम मलिक म्हणाले, "मे महिना हा एक महत्त्वाचा महिना असेल. विशेषतः पुढील १७ दिवस, कारण युद्धविरामाची घोषणा होऊनही तणाव खूप जास्त आहे. १७ दिवसांत भारत पुन्हा पाकिस्तानचं टेन्शन वाढवू शकतो आणि हल्ला करू शकतो. कारण युद्ध अजून संपलेले नाही. तणाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तानने सतर्क आणि सावध राहिले पाहिजे."
मलिक यांनी यावेळी पाकिस्तानी सैन्याच्या मुद्द्याचा पुनरुच्चार केला की पाकिस्तानने लढाईत पाचपेक्षा जास्त भारतीय विमाने पाडली आहेत आणि युद्ध संपलेले नाही, फक्त युद्धविराम लागू आहे. पाकिस्तानी नेत्यांमध्ये भारताच्या हल्ल्याची भीती ही नवीन गोष्ट नाही. पहलगाम हल्ल्यानंतर, पाकिस्तान दोन आठवडे भीतीच्या छायेत राहिला आणि ७ मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून ही भीती खरी ठरवली. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानी दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले आणि १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला.
यानंतर पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भारतावर हल्ला करण्याने अनेक अयशस्वी प्रयत्न केले, पण प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानची अनेक शहरे हादरवली. पाकिस्तान आणि भारत यांच्यात आता युद्धविराम असला तरी, भारताची भीती पाकिस्तानमध्ये अजूनही दिसत आहे.