अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धबंदी आणि टॅरिफबाबत पुन्हा मोठे विधान केले आहे. यावेळी त्यांनी म्हटले की, भारतावर २० ते २५ टक्के टॅरिफ लादले जाऊ शकते. मात्र, त्यांनी असेही म्हटले की अद्याप शुल्काबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. भारत २०-२५% दरम्यान शुल्क देणार आहे का? असे विचारले असता, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होकारार्थी उत्तर दिले.
ट्रम्प म्हणाले की, भारत माझा चांगला मित्र देश आहे. माझ्या विनंतीवरून त्यांनी पाकिस्तानसोबतचे युद्ध संपवले. मात्र, भारतासोबतचा करार अद्याप अंतिम झालेला नाही. भारत हा एक चांगला मित्र आहे, परंतु त्यांनी मुळात इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त टॅरिफ लादले आहे.
भारत-पाकिस्तान युद्धबंदी घडवून आणण्याचा दावाअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यादरम्यान, टॅरिफवरील प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी म्हटले की, भारत हा एक चांगला मित्र आहे, परंतु गेल्या काही वर्षांत त्यांनी अमेरिकन वस्तूंवर आतापर्यंतचा सर्वाधिक टॅरिफ लावला आहे. यासोबतच ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला की त्यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आणली आहे. ते म्हणाले की, मी भारताला पाकिस्तानसोबतचा संघर्ष संपवण्याचे आवाहन केले होते.
अमेरिकेतून टीम भारतात येणार!भारतासह अनेक देश अमेरिकेसोबत व्यापार करार अंतिम करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढील महिन्यात अमेरिकेचे पथक बैठकीसाठी भारतात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांमधील प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारावरील पुढील फेरीच्या चर्चेसाठी अमेरिकेची ही टीम २५ ऑगस्ट रोजी भारतात येणार आहे.
ट्रम्प यांनी टॅरिफ लावण्याची धमकी दिली!डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील देशांना इशारा दिला होता की, ज्या देशांनी आमच्याशी व्यापार करार केला नाही त्यांच्याकडून आम्ही १५ ते २० टक्के कर आकारू शकतो. हे एप्रिल महिन्यात अमेरिकेने ठरवलेल्या १०% कर बेसलाइनपेक्षा खूपच जास्त आहे. तथापि, यामुळे लहान देशांवर आर्थिक दबाव येऊ शकतो.