रशियन दूतावासात आयोजित नियमित पत्रकार परिषदेत, रशियन दूतावासाचे मिशन उपप्रमुख रोमन बाबुश्किन यांनी माध्यमांचे हिंदीमध्ये अभिवादन करून उपस्थितांना आश्चर्यचकित केले. ते हसले आणि म्हणाले, "चला सुरुवात करूया... श्री गणेश करूया!" दरम्यान बाबुश्किन यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र दिनाच्या दिवशी (15 ऑगस्ट) अनेक मोठ्या घोषणा केल्या. यावेळी 'सुदर्शन चक्र' मिशनचीही घोषणा करण्यात आली होती. हे मिशन भारताच्या नव्या संरक्षण प्रणालीसंदर्भात आहे. ज्या अंतर्गत भारत शत्रूच्या हवाई हल्ल्यांपासून स्वतःचे संरक्षणच करणार नाही, तर उलट हल्ला देखील करेल. आता यात मिशनमध्ये रशियानेही रस दाखवला आहे.
दरम्यान, रशियन दूतावासाचे मिशन उप-प्रमुख रोमन बाबुश्किन यांनीही याचा उल्लेख केला. भारताच्या आयर्न डोम मिशन सुदर्शन चक्र संरक्षण प्रणालीमध्ये (डिफेन्स सिस्टिम) रशियन भागीदारीसंदर्भातही त्यांनी भाष्य केले. तसेच, या प्रणालीच्या विकासात रशियन उपकरणांचाही समावेश असेल, अशी आशाही बाबुश्किन यांनी व्यक्त केली.
ट्रम्प टॅरिफवरही केलं भाष्य --रशियाकडून तेल खरेदी केल्यास, भारतावर २५% अतिरिक्त दंड लादण्याच्या अमेरिकेच्या धोरणावरही बाबुश्किन यांनी भाष्य केले. ते म्हणाले, "रशिया हा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे आणि भारत हा सर्वात मोठा ग्राहक. कोणतीही एकतर्फी कृतीने पुरवठा साखळीत व्यत्यय येतो. किंमतींमध्ये असंतुलन निर्माण करते आणि जागतिक बाजारपेठ अस्थिर होते. यामुळे विकसनशील देशांची ऊर्जा सुरक्षा धोक्यात येते."
एवढेच नाही तर, अमेरिका आणि पाश्चात्य देशांवर थेट हल्ला चढवत ते म्हणाले, "ते नवीन वसाहतवादी शक्तींप्रमाणे वागत आहेत, ज्या केवळ स्वतःच्याच फायद्याचा विचार करतात. हा दबाव अन्याय्य आणि एकतर्फी आहे."