पाकिस्तानविरोधात बलूचिस्तानमधील लोकांनी स्वातंत्र्याची लढाई आणखी आक्रमक केली आहे. सोशल मीडियात बलूच नेता मीर यार बलूचने बलूचिस्तान पाकिस्तानपासून स्वातंत्र्य झाल्याची घोषणा केली, त्यानंतर Republic of Balochistan Announced असा ट्रेंड सुरू झाला. या घोषणेनंतर भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्राकडे एकापाठोपाठ एक मागण्या सुरू केल्या आहेत.
बलूच कार्यकर्ता आणि लेखक मीर यार बलूच यांनी सोशल मीडियावर बलूचिस्तान स्वातंत्र्याची घोषणा करत लिहिलं की, आम्ही आमच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानचा दहशतवादी प्रयोग आता कोसळणार आहे. भारत सरकार बलूचिस्तानला दिल्लीत अधिकृत कार्यालय आणि दूतावास उघडण्याची परवानगी द्यावी. त्याशिवाय बलूच स्वातंत्रता सैनिकांनी डेरा बगुती इथल्या गॅस प्रकल्पावर हल्ला केला. जे पाकिस्तानातील मोठे गॅस पुरवठा केंद्र आहे असं त्यांनी सांगितले.
बलूच नेत्याने संयुक्त राष्ट्राकडेही अपील केले आहे. संयुक्त राष्ट्राने त्यांचे शांतता सैनिक बलूचिस्तानात पाठवावे आणि पाकिस्तानी सैन्याला आमच्या जमिनीवरुन, समुद्रातून आणि हवाई हद्दीतून बाहेर काढावे. पाकिस्तानी सैन्याची सर्व संपत्ती बलूचिस्तानला सोपवली जावी. सर्व गैर बलूच सैनिक, आयएसआय आणि प्रशासकीय अधिकारी यांनी प्रदेश सोडावा अशी मागणीही मीर यार बलूच यांनी केली.
नव्या सरकारची तयारी, महिला कॅबिनेटचा दावा
लवकरच एक अंतरिम बलूच सरकार बनवले जाईल. ज्यात महिलांना प्रतिनिधित्व मिळेल. स्वातंत्र सरकारचा समारंभही लवकर होईल. आम्ही जगातील मित्र देशांच्या राष्ट्राध्यक्षांना या सोहळ्यात आमंत्रित करत आहोत असं मीर यार बलूच यांनी म्हटलं.
BLA ने सैन्य वाहन उडवले, १४ पाक सैनिक ठार
एका व्हिडिओत पाकिस्तानी सैन्याचे वाहन बॉम्बने उडवल्याचे दिसून येते. बलूच लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. त्यात १४ पाकिस्तानी जवान ठार झाल्याचे सांगितले. लंडनमध्ये राहणाऱ्या फ्री बलूचिस्तान मूवमेंटचे नेते हिर्बयार मीर यांनी मुंबईतील जिन्ना हाऊसला बलूचिस्तान हाऊसमध्ये बदलावे अशी मागणी भारताकडे केली आहे. जेव्हा पाकिस्तानी संस्थापक जिन्नाने भारताच्या फाळणीचा प्लॅन बनवला होता तेव्हापासून बलूच स्वातंत्र्याची लढाई लढत आहे. बलूच मुद्द्याकडे १९४७ पासून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत मीर यांनी संयुक्त राष्ट्रावर पक्षपातीपणाचा आरोप केला.