पहलगाम हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूरमधूनपाकिस्तानात जोरदार हल्ला केला. त्यात अनेक दहशतवादी तळांना टार्गेट करण्यात आले. मात्र या हल्ल्याने बिथरलेल्या पाकिस्ताननेभारताच्या सीमेवरील नागरी वस्त्त्यांवर भ्याड ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकचे हे हल्ले भारताच्या एअर डिफेन्स प्रणालीने हाणून पाडले परंतु या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने पाकच्या सैन्य एअरबेसवर हल्ले केले. त्यात पाकिस्तानचे प्रचंड मोठे नुकसान झाले. भारताच्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानची पळता भुई थोडी झाली. या ४ दिवसांच्या संघर्षात पाकिस्तानी सैन्य आणि एअरबेसला टार्गेट करण्यात भारताला यश आले असं अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. हायरिजॉल्यूशन सॅटेलाईट फोटोच्या सहाय्याने हा रिपोर्ट तयार केला आहे.
रिपोर्टनुसार, भारताचे हल्ले प्रभावी आणि चांगल्या प्रकारे लक्ष्यित होते. या हल्ल्यामुळे पाकिस्तानी सैन्य एअरबेसला मोठे नुकसान झाले. भारत-पाकिस्तानातील हा संघर्ष गेल्या ५० वर्षातील सर्वात मोठा होता. ज्यात ड्रोन आणि मिसाईलचा पुरेपूर उपयोग करण्यात आला. सॅटेलाईट फोटोत पाहिले तर हे हल्ले व्यापक होते, परंतु नुकसान दाव्याच्या तुलनेत मर्यादीत होते असं त्यात उल्लेख आहे.
भारत वरचढ ठरला - रिपोर्ट
सॅटेलाईट फोटोवरून स्पष्ट दिसते की, भलेही दोन्ही देशांनी एकमेकांना प्रचंड नुकसान पोहचवल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्ष आणि मोठे नुकसान भारताने पाकिस्तानचे केले आहे. आधुनिक युद्धप्रणाली, सशस्त्र क्षमतेचा वापर करून दोन्ही देशांनी हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले. परंतु भारताने विशेषत: पाकिस्तानी हवाई दलाच्या क्षमता आणि एअरफिल्ड्सला टार्गेट केले.
भोलारी एअरबेसवर हल्ला
सर्वात महत्त्वाच्या हल्ल्यांपैकी एक कराची येथील भोलारी एअरबेसवर भारताने केलेला हल्ला आहे. ज्याठिकाणचे सॅटेलाईट फोटोमध्ये स्पष्टपणे विमान हँगरला नुकसान पोहचल्याचे दिसते. पाकिस्तानच्या कराचीपासून १०० मैल दूर असलेल्या भोलारी एअरबेसवर भारताने एअरक्राफ्टच्या मदतीने टार्गेट हल्ला केला.
नूर खान एअरबेस - सर्वात संवेदनशील टार्गेट
भारताने पाकिस्तानच्या सर्वात संवेदनशील असलेल्या नूर खान एअरबेसवर हल्ला केला. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये हा एअरबेस आहे. सैन्य मुख्यालय आणि पंतप्रधान कार्यालयही जवळ आहे. हे युनिट पाकिस्तानच्या अण्वस्त्राची सुरक्षा करते. येथेही भारताने अचूक हल्ला करत मोठे नुकसान पोहचवले.
पाकिस्तानचे दावे पोकळ
भारताच्या या हल्ल्याला पाकिस्तानी सैन्यानेही प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला. पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, त्यांनी भारताच्या उधमपूर एअरबेसवर हल्ला केला परंतु १२ मे रोजी घेतलेल्या सॅटेलाईट फोटोत याचे काही पुरावे सापडत नाहीत. या एअरबेसवर कुठेही नुकसान झाले नसल्याचं दिसून येते. ४ दिवस चाललेल्या या संघर्षात १० मे रोजी भारत-पाकिस्तानात युद्धविराम करण्यावर सहमती झाली. या संपूर्ण प्रकरणी भारताच्या सैन्य कारवाईत पाकिस्तानच्या युद्धक्षमतेची पोलखोल झाली. ज्याची पुष्टी जागतिक माध्यमे, सॅटेलाईट डेटा करत आहेत.