India Maldives Relations: काही काळापूर्वी भारतविरोधी भूमिका घेणारे मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू यांचे मतपरिवर्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. पूर्वी चीनच्या मांदीवर बसणारे मुइझ्झू भारतासोबतचे संबंध पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुइझ्झू यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच मालदीवच्या दौऱ्यावर गेले होते. यादरम्यान, पीएम मोदींचे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर आता त्यांनी भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान भारताने मालदीवला ५००० कोटी रुपयांची नवीन क्रेडिट लाइन (आर्थिक मदत) जाहीर केली आहे. याबद्दल राष्ट्रपती मुइझ्झू यांनी भारताचे आभार मानले. यामुळेच आता भारत आणि मालदीवमधील संबंधांमध्ये एक नवीन वळण आले. पीएम मोदींच्या भेटीनंतर मोहम्मद मुइझ्झू यांनी भारताला आपला सर्वात जवळचा भागीदार देश म्हणून वर्णन केले.
काय म्हणाले राष्ट्रपती मुइझ्झू ?मीडियाशी बोलताना मुइझ्झू म्हणाले की, मालदीव आता भारतासोबत मुक्त व्यापार करार पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. जेव्हा हा करार होईल, तेव्हा दोन्ही देशांच्या व्यापाऱ्यांना मोठा फायदा होईल. मालदीव भारताकडून मिळालेल्या ५,००० कोटी रुपयांच्या मदतीचा वापर रुग्णालये, घरे, शाळा आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी करेल. ही मदत आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.