Donald Trump on India Tariffs: रशियाकडून तेल खरेदी बंद करा, असा धोशा लावणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने खडेबोल सुनावले. भारताने मुद्देसूदपणे अमेरिकेच्या डोळ्यात अंजन घातल्यानंतर अध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा एकदा थयथयाट केला. भारत एक चांगले व्यापारी राष्ट्र नसल्याचे म्हणत ट्रम्प यांनी पुढील २४ तासात मी भरपूर टॅरिफ लागू करणार असल्याचा नवा इशारा दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सीएनबीसी या वृत्तवाहिनीला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आम्ही भारतासोबत व्यापार करत नाही, असेही विधान केले आहे. रशियाकडून तेल खरेदी थांबवत नसल्यामुळे २५ टॅरिफ लावण्याचे ठरवले होते, पण आता मी आणखी जास्त टॅरिफ लावणार आहे, असा धमकी वजा इशारा ट्रम्प यांनी दिला.
अमेरिका भारतासोबत व्यापार करत नाही -डोनाल्ड ट्रम्प
या मुलाखतीत बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "भारता एक चांगले व्यापारी राष्ट्र नाहीये. कारण ते आमच्यासोबत भरपूर व्यापार करतात, पण आम्ही (अमेरिका) त्यांच्यासोबत व्यापार करत नाही. त्यामुळे भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याचे निश्चित केले होते; पण आता मला वाटतंय की, पुढील २४ तासांमध्ये मी जास्त टॅरिफ आकारणार आहे. कारण ते (भारत) रशियाकडून तेल खरेदी करत आहेत", अशी भूमिका ट्रम्प यांनी मांडली.
...तर पुतीन लोकांची हत्या करणं थांबवतील
जागतिक तेल बाजारातील किंमतीचा मुद्दा मांडत डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे युद्ध थांबवतील असेही सांगितले.
"जर जागतिक बाजारात तेलाच्या किंमती घसरल्या, तर पुतीन लोकांची हत्या करणं थांबवतील. जर तुम्ही तेलाच्या किंमती १० डॉलर प्रति बॅरल कमी केल्या, तर त्यांच्याकडे (व्लादिमीर पुतीन) कोणताही पर्याय शिल्लक राहणार नाही. कारण त्यांची अर्थव्यवस्थाच डबघाईला लागेल", असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ३० जुलै रोजी भारतावर २५ टक्के टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली. त्यानंतर ४ ऑगस्ट रोजी त्यांनी भारत रशियाकडून तेल विकत घेऊन खुल्या बाजारात विकतो आणि नफा कमवत आहे, असा आरोप केला. त्याचबरोबर भारतावरील टॅरिफ आणखी जास्त वाढवणार आहे, असेही म्हटले होते.
भारताने अमेरिका आणि युरोपियन युनियनला दिले उत्तर
रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या मुद्द्यावरून डोनाल्ड ट्रम्प आणि युरोपियन युनियनकडून भारतावर टीका होत आहे. त्यावरून भारताने खडेबोल सुनावले. युक्रेन-रशिया युद्धानंतर तेल पुरवठा युरोपियन देशाकडे वळवला गेला, तेव्हा रशियाकडून तेल खरेदीला अमेरिकेनेच भारताला प्रोत्साहन दिले होते, असे भारताने म्हटले आहे. त्याचबरोबर कोणतीही अपरिहार्यता नसताना अमेरिका आणि युरोपियन युनियन रशियासोबत व्यापार करत आहे, असेही भारताने सुनावले आहे.