वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतीय वस्तूंवर २५ टक्के अतिरिक्त समतुल्य आयात शुल्क (टॅरिफ) लावले. त्याबरोबर अमेरिकेत भारतीय वस्तूंवर लागणारे टॅरिफ आता ५० टक्क्यांवर पोहोचले आहे. भारताने रशियाकडून खनिज तेल खरेदी सुरूच ठेवल्यामुळे दंड म्हणून अतिरिक्त शुल्क लावण्यात येत असल्याचे ट्रम्प यांनी जारी केलेल्या कार्यकारी आदेशात म्हटले आहे.
ट्रम्प यांनी मागील आठवड्यात भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. हे टॅरिफ लागू होण्यास काही तास बाकी असतानाच त्यांनी अतिरिक्त शुल्क लावणारा एक कार्यकारी आदेश जारी केला आहे. या आदेशानंतर काही सूट असलेल्या वस्तू वगळता इतर सर्व भारतीय वस्तूंवर एकूण ५० टक्के टॅरिफ लागू होईल. गेल्या आठवड्यातील टॅरिफ ७ ऑगस्टपासून लागू होईल, तर बुधवारचे टॅरिफ २१ दिवसानंतर लागू होईल.
रशियाकडून तेल आणि वायू खरेदी करणाऱ्या भारतावर २४ तासांत टॅरिफ लावण्याचा इशारा ट्रम्प यांनी मंगळवारी दिला होता. ट्रम्प यांनी म्हटले होते की, ‘भारत चांगला व्यापारी भागीदार नाही. पुढील २४ तासांत भारतावरील टॅरिफमध्ये मोठी वाढ करणार आहे; कारण भारत अजूनही रशियन तेल खरेदी करीत आहे. रशिया या पैशांचा वापर युक्रेन विरुद्ध युद्धात करीत आहे. भारत स्वस्त तेलासाठी या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे. ट्रम्प यांनी ३० जुलै रोजी २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा करतानाही असेच वक्तव्य केले होते.
भारतावर काय होणार परिणाम?अमेरिकेने लादलेल्या टॅरिफचा भारतावर मोठा आर्थिक परिणाम होऊ शकतो. अमेरिकेच्या टॅरिफचा कापड व रेडिमेड कपडे, रत्ने व आभूषणे, इंजिनिअरिंग सामान व ऑटो पार्ट्स, मसाले व कृषी उत्पादनांच्या मागणीवर विपरित परिणाम होऊ शकतो. मागणीवर परिणाम झाल्याने निर्यात घटू शकते व कंपन्यांतील लाखो नोकऱ्यांवर संकट येऊ शकते.
आरबीआयने दाखविला अमेरिकेला आरसाडोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हटले होते. त्याला उत्तर देताना आरबीआयचे गवर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, आम्ही जागतिक अर्थव्यवस्थेला १८ टक्के योगदान देत आहोत. अमेरिकेचे योगदान केवळ ११ टक्के आहे. भारतीय अर्थव्यवस्था उत्तम काम करीत आहे, पुढेही करीत राहील.अन्यायकारक, अनुचित, अवाजवीअमेरिकेने लावलेले ५० टक्के टॅरिफ ‘अन्यायकारक, अनुचित व अवाजवी’ असल्याचे भारताने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, देशाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील. तेल आयात ही बाजारातील स्थिती व १४० कोटी भारतीयांच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी केली जाते आणि असे पाऊल इतरही अनेक देश उचलत आहेत.
आर्थिक ब्लॅकमेल!लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, ५० टक्के टॅरिफ हे भारताला अन्यायकारक व्यापार करारासाठी धमकावणारे ‘आर्थिक ब्लॅकमेल’ आहे.