संयुक्त राष्ट्रसंघ : गाझामध्ये ठराविक काळापुरती युद्धबंदी लागू करणे उपयोगाचे नाही. अशी युद्धबंदी स्थानिक लोकांसमोरील आव्हाने कमी करण्यासाठी पुरेशी नाही. त्यामुळे येथे पूर्ण युद्धबंदी लागू करणे गरजेचे असल्याचे भारताने म्हटले आहे. बुधवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरिश यांनी ही भूमिका मांडली. ‘मानवी संकटाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक महत्त्वाची आहे. गाझामध्ये ठराविक वेळेपुरती युद्धबंदी उपयोगाची नाही. हे लोक रोज अन्न आणि इंधनासाठी, उपचार आरोग्याच्या प्रश्नांसह शिक्षण अशा प्रश्नांसाठी लढत आहेत. त्यामुळे ही मानवी वेदना आणखी वाढू नये म्हणून लक्ष देण्याची गरज आहे’, असे पर्वतनेनी हरिश म्हणाले. शांततेला दुसरा कोणताच पर्याय नाही. सर्व ओलिसांची सुटका करून सुसंवादातून राजनैतिक मार्गाने युद्धबंदी लागू करणे हाच एकमेव पर्याय असल्याची भूमिका भारताने मांडली. इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावर आयोजित संयुक्त राष्ट्रसंघाच्या आगामी अधिवेशनात यामुळे नवा मार्ग सापडेल, असेही भारताने म्हटले आहे. सौदी अरब आणि फ्रान्सच्या सहअध्यक्षतेखाली हे अधिवेशन जूनमध्येच होणार होते. परंतु, पश्चिम आशियात वाढता तणाव पाहता हे अधिवेशन लांबले होते.
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 05:59 IST