वॉश्गिंटन - अमेरिकेचे कॉमर्स मिनिस्टर हॉवर्ड लुटनिक यांनी पुन्हा एकदा भारतावर गरळ ओकली आहे. रशियाकडून तेल खरेदी आणि चीनसोबत जवळीक साधल्याचा राग लुटनिक यांनी भारतावर काढला. भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच पुन्हा व्यापारी चर्चा होऊ शकते असं डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय असलेले लुटनिक यांनी म्हटलं आहे. पण त्यासाठी त्यांनी भारतासमोर भारतासमोर माफीसह ४ अटी ठेवल्या आहेत.
ब्लूमबर्गसोबतच्या मुलाखतीत लुटनिक यांनी अरेरावीपणा दाखवत भारताला अमेरिकेची माफी मागावी लागेल असं म्हटलं. पुढील एक दोन महिन्यात भारत चर्चेसाठी तयार होईल आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत तडजोड करण्याचा प्रयत्न करेल. भारत अमेरिकेची माफी मागून व्यापारी चर्चेसाठी विनवणी करू शकतो असं त्यांनी सांगितले. माफीशिवाय आणखी ३ अटी लुटनिक यांनी केल्या आहेत.
भारताला बाजारपेठ उघडावी लागेल
हॉवर्ड लुटनिक यांनी भारतासोबत चांगले संबंध बनवण्यासाठी बाजारपेठ उघडण्याची मागणी केली आहे. अमेरिकेने भारतासाठी त्यांची बाजारपेठ कायम खुली केली आहे परंतु भारताने तसे केले नाही. भारतालाही त्यांची बाजारपेठ अमेरिकन साहित्यासाठी उघडावी लागेल. लुटनिक यांच्यापूर्वी ट्रम्प यांनीही हे म्हटलं आहे.
रशियासोबत संबंध मर्यादित ठेवावे लागतील
लुटनिक यांनी भारतासमोर आणखी एक अट ठेवली ती म्हणजे रशियासोबत संबंध मर्यादित ठेवावे लागतील. भारताने अलीकडेच रशियाकडून तेल खरेदी करणे वाढवले आहे. हे योग्य नाही, कारण रशियाला याचा वापर युक्रेनविरोधात युद्धासाठी करत आहे. भारताला अमेरिकेशी संबंध ठेवायचे असतील तर त्यांना रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करायला हवे.
'ब्रिक्स'मधून बाहेर पडावे
ब्रिक्स देश डॉलरला पर्याय शोधत आहेत, भारतही त्याच संघटनेचा भाग आहे. त्यामुळे भारताने अमेरिकेचे समर्थन करायला हवे, जिथे डॉलरला पर्याय शोधला जात आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात भारताला बिक्समधून बाहेर पडावे लागेल असं म्हटलं आहे. ब्रिक्स देश अमेरिकेच्या विरोधातील गट असल्याचं लुटनिक म्हणाले.
दरम्यान, भारताला जर रशिया आणि चीन यांच्यातील ब्रीज बनायचे असेल तर त्यांनी बनावे, परंतु अमेरिकेचे समर्थन करावे. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी तणाव आहे परंतु लवकरच भारत माफी मागून राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चेसाठी पुढे येईल. भारत ट्रम्प यांच्यासोबत नव्याने चर्चा करेल. ही चर्चा ट्रम्प यांच्या शर्तींवर असेल, जी पंतप्रधान मोदींसोबत ते फायनल करतील असा दावाही हॉवर्ड लुटनिक यांनी केला आहे.