Tariff War: चीन आणि अमेरिकेमध्ये सध्या टॅरिफ युद्ध भडकले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवल्यानंतर चीननेही त्याला उत्तर दिले. ट्रम्प यांनी चीनवर टॅरिफचा बॉम्बच फोडला असून, आता चीनही कंबर कसताना दिसत आहे. पण, ट्रम्प यांच्या टॅरिफ बद्दल विरोधी देशांची मोट बांधण्याच्या चीनच्या प्रयत्नांना पहिला झटका बसला आहे. कारण चीनने ऑस्ट्रेलियासमोर एकत्र येण्यासाठी मैत्रीचा हात पुढे केला होता. तो ऑस्ट्रेलियाने झटकला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवर १०४ टक्के टॅरिफ लावला. त्यामुळे भडकलेल्या चीनने अमेरिकन वस्तूंवर आकारला जाणारा टॅरिफ ३४ टक्क्यांवरून ८४ टक्के इतका वाढवला. या निर्णयामुळे ट्रम्प संतापले आणि त्यांनी चीनमधून येणाऱ्या वस्तूंवरील टॅरिफ तब्बल १२४ टक्के इतका केला.
चीनचा ऑस्ट्रेलियासमोर प्रस्ताव काय?
अमेरिकेने ऑस्ट्रेलियातून येणाऱ्या वस्तूंवरही १० टक्के टॅरिफ लागू केला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा व्यावसायिक भागीदार असलेल्या चीनवर १२ पट जास्त टॅरिफ आकारला आहे. त्यामुळे चीनने ऑस्ट्रेलियासमोर या टॅरिफ विरोधातील लढ्यात सहभागी होण्याचा प्रस्ताव ठेवला.
ऑस्ट्रेलियातील चीनचे उच्चायुक्त शियाओ कियान यांनी गुरूवारी एक लेख लिहिला होता, ज्यात ऑस्ट्रेलियाने सहकार्य करण्याचे आवाहन केले आणि एकजूटीने विरोध करणे हेच अमेरिकेच्या वर्चस्ववादी आणि धमकावणाऱ्या व्यवहाराला रोखण्याचा एकमेव उपाय असल्याचे म्हटले होते.
ऑस्ट्रेलियाने काय म्हटले?
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बनीज यांनी याबद्दल भूमिका मांडता सांगितले की, 'ऑस्ट्रेलियाचे लोक स्वतःसाठी बोलतील.' तर संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, 'आमचा देश चीनचा हात धरणार नाही.'
चीन-अमेरिकेची चर्चा सुरू झालीये का?
टॅरिफबद्दल चीनने अमेरिकेसोबत चर्चा सुरू केल्याचे वृत्तही समोर आले होते. त्याबद्दल चीनच्या वाणिज्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'चीनची भूमिका स्पष्ट आणि दृढनिश्चयाची आहे. जर अमेरिकेला चर्चा करायची असेल, तर आमचे दरवाजे खुले आहेत. पण, चर्चा एकमेकांच्या सन्मान राखून आणि समानतेवर व्हायला हवी.'