Imran Khan Pakistan Donald Trump : पाकिस्तानात केव्हा काय घडेल याची काहीच कल्पना करता येत नाही. एकेकाळी पाकिस्तानी जनतेने माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांना थेट देशाचे पंतप्रधान बनवले. आता तेच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान बऱ्याच काळापासून तुरुंगात आहेत. एवढ्यात तरी ते तुरुंगातून बाहेर येतील अशी कुठलीही चिन्हं नाहीत. इम्रान खानची सुटका न होण्याला हे पाकिस्तानातील संपुष्टात आलेली लोकशाही आणि कायद्याच्या विरोधात सुरू असलेली हुकूमशाही जबाबदार आहे, असे दावे इम्रान समर्थक उघडपणे करत आहेत. टाईम मासिकात इम्रान खान यांच्या नावाने प्रकाशित झालेल्या एका लेखात, इम्रान खान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मदतीसाठी दाद मागितली असल्याची माहिती आहे. इम्रान खानने ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्याचे केले आहे. तसेच अमेरिका आर्थिक भागीदारी वाढवण्यासाठी, स्थिरतेला चालना देण्यासाठी आणि दहशतवाद रोखण्यासाठी पाकिस्तानसोबत काम करेल अशी आशाही व्यक्त केली आहे.
इम्रान खान यांचा हा लेख मासिकापर्यंत कसा पोहोचला याबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही. पण इम्रान खान यांनी पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या 'राजकीय गोंधळावर' आणि लोकशाहीसाठी सुरू असलेल्या त्यांच्या लढाईवर चिंतन करणारा विचार मांडला आहे. त्यांनी देशातील लोकशाहीच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि सध्याचा काळ हा पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात आव्हानात्मक काळ असल्याचे वर्णन केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्र येऊन पाकिस्तानमध्ये त्यांच्या अटकेविरोधात आणि लोकशाहीसाठी आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे.
लेखात त्यांनी स्वत:ची अटक की राजकीय हेतुने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. त्यांची तुरुंगवासाची शिक्षा आणि त्यांच्यावरील आरोप लोकशाही तत्त्वांचे उल्लंघन करणारे आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित होते असेही ते म्हणाले आहेत. त्यांनी असा दावा केला की त्यांचा संघर्ष वैयक्तिक नव्हता, तर लोकशाही वाचवण्यासाठी होता, ज्याचा परिणाम केवळ देशावरच नाही तर संपूर्ण उपखंडावर होईल. पाकिस्तानचे जागतिक महत्त्व लक्षात घेऊन हे संकट लवकरात लवकर सोडवण्यासाठी पुढे येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
दहशतवादाच्या मुद्द्यावर लिहिताना ते म्हणाले आहेत की, पाकिस्तान सरकार पीटीआयविरुद्ध राजकीय हल्ल्यांवर लक्ष केंद्रित करत आहे. त्यांच्यावर चालू असलेल्या दहशतवादविरोधी कारवायांवर लक्ष केंद्रित करणे आणि त्यांना मिळणाऱ्या संसाधनांमध्ये कपात करणे हेच सरकारचे लक्ष्य आहे. खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान सारख्या भागात सर्वाधिक दहशतवादी कारवाया होत आहेत, पण तेथे राजकीय हेतुने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. पाकिस्तानातील न्यायव्यवस्था राजकीय दडपशाहीचे साधन बनली आहे, असा दावाही इम्रान यांनी केला आहे.