वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज वॉशिंग्टन डीसी येथे बैठक होणार आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेची सत्ता सांभाळल्यानंतर पहिल्यांदाच मोदी ट्रम्प यांची भेट होत आहे. या भेटीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले असून दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर अनेक महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ही भेट अमेरिकन राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान व्हाईट हाऊसमध्ये होत आहे. मात्र तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर शुल्काची घोषणा केली आहे.
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी व्यापारी भागीदारांकडून होणाऱ्या आयातीवर परस्पर शुल्क लागू करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. याचा अर्थ अमेरिकेत कुठल्याही देशाच्या आयात वस्तूवर तितकाच कर लावला जाईल, जितका त्या देशात अमेरिकन वस्तूच्या आयातीवर लावला जात आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियातून एक पोस्ट केली, त्यात म्हटलं की, आजचा दिवस मोठा आहे, परस्पर शुल्क..अमेरिकेला पुन्हा महान बनवलं आहे असं त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. विशेष म्हणजे भारतात जवळजवळ इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त कर आहेत असंही ट्रम्प यांनी म्हटलं.
परंतु ट्रम्प यांनी परस्पर शुल्काची व्याख्या स्पष्ट केली नाही. त्यांचा हा आदेश कुठल्या उत्पादनावर लागू असेल. जर परकीय व्यापारातील शुल्कात वाढ झाली तर जागतिक अर्थव्यवस्थेला त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र टॅरिफमुळे देशांतर्गत उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्माण होण्यास मदत मिळेल असा विश्वास ट्रम्प यांना वाटतो. अमेरिकेने याआधीच चीनी वस्तूंवर १० टक्के अतिरिक्त कर लादला आहे. त्याशिवाय कॅनडा आणि मॅक्सिको यांच्यावर लावण्यात आलेल्या शुल्काच्या निर्णयाला ३० दिवस स्थगिती दिली आहे. मात्र त्यानंतर हा शुल्क लादण्याची तयारीही अमेरिकेने केली आहे.
दरम्यान, ट्रम्प यांनी स्टील आणि अॅल्युमिनियम आयातीवर शुल्क लादला आहे तर कॅम्प्युटर चिप्स,औषधे यांच्यावर नवीन शुल्क लावण्याचा विचार करत आहेत. अमेरिकेच्या या निर्णयामुळे युरोपीय संघ, कॅनडा आणि मॅक्सिकोही प्रत्युत्तरासाठी पाऊल उचलण्याची तयारी करत आहेत. दुसरीकडे चीनने अमेरिकेच्या ऊर्जा, कृषी मशिनरी आणि मोठ्या इंजिनच्या वाहनांवर शुल्क वाढवला आहे. गुगलविरोधातही चीनने कारवाई करण्यासाठी तपास सुरू केला आहे.
Reciprocal Tariffs म्हणजे काय?
परस्पर शुल्क(Reciprocal Tariff) म्हणजे ज्या देशाने अमेरिकन उत्पादनावर जितका कर लावला आहे तितकाच कर अमेरिकेत संबंधित देशाच्या उत्पादनावर लावला जाईल. या सरळ अर्थ म्हणजे, जर भारताने अमेरिकन उत्पादनावर जास्त कर लावला असेल तर अमेरिकेतही भारतीय उत्पादनावर समान दर आकारत शुल्क वाढवले जाऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, Reciprocal Tariff चा सर्वाधिक परिणाम भारत, थायलँड आणि अन्य काही देशांच्या अर्थव्यवस्थेवर पडू शकतो. कारण या देशात अमेरिकन उत्पादनावर आधीच जास्त शुल्क आकारले जाते.