India-Pak Tension: पहलगाम हल्ल्यानंतर भारतपाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे संपूर्ण पाकिस्तान घाबरला आहे. पाकिस्तानात सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. सामान्य जनतेपासून ते सरकार आणि राजकारण्यांपर्यंत, सर्वजण भीतीच्या वातावरणात जगत आहेत. ही दहशत किती आहे याचे एक उदाहरण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेचे सदस्य शेर अफजल खान मारवत यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक भूमिका घेत अनेक निर्बंध लादले आहेत. भारताची तयारी पाहून तिथले सरकार आणि नेते चिंतेत पडले असून ते आता ते देश सोडून जाण्याबद्दल बोलत आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाची भीती वाढताना दिसत आहे. अशातच पाकिस्तानी खासदार आणि इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे नेते शेर अफजल खान मारवत यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका पाकिस्तानी रिपोर्टरशी बोलत आहे.
पत्रकाराने मारवतला यांना विचारले की, जर युद्ध वाढले तर तुम्ही बंदूक घेऊन सीमेवर जाल का? त्यावर उत्तर देताना, मारवत यांनी असे काही म्हटलं की ज्यामुळे पाकिस्तानची मान शरमेने झुकली आहे. पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना मारवत यांनी "नाही, जर युद्ध वाढले तर मी इंग्लंडला निघू जाई," असं म्हटलं.
यानंतर पत्रकाराने दुसरा प्रश्न विचारला की, अशावेळी परिस्थिती सामान्य होण्यासाठी पंतप्रधा मोदींनी थोडे मागे हटावे असे तुम्हाला वाटत नाही का? यावर उत्तर देताना शेर अफझल खान मारवत यांनी, "मोदी माझ्या मावशीचा मुलगा आहे का की ते माझ्या शब्दांवर माघार घेतील?" असं म्हटलं.
शेर अफजल खान मारवत यांचे हे विधान काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या राजकारणावर टीका करत जेव्हा नेत्यांना त्यांच्या सैन्यावर विश्वास नाही, तर सामान्य लोकांनी काय अपेक्षा करावी? असं म्हटलं आहे. शेर अफजल खान मारवत हे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयशी संबंधित आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी काळात त्यांनी पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वावर टीका केली होती. यामुळे संतप्त होऊन इम्रान खान यांनी त्यांना पक्षातील अनेक महत्त्वाच्या पदांवरून काढून टाकले.