लंडन - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काश्मीर वादाचा मुद्दा अनेकदा पाकिस्तानकडून जागतिक व्यासपीठावर मांडण्याचा प्रयत्न केला जातो. सध्या भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यूके दौऱ्यावर गेलेत. यावेळी काश्मीरबाबत पाकिस्तानच्या पत्रकाराने जयशंकर यांना प्रश्न विचारला असता त्यावर जयशंकर यांनी दिलेल्या उत्तराने पत्रकाराची बोलती बंद झाली. पाकिस्तानने जर पीओकेवरील ताबा काढला तर काश्मीर प्रश्न सुटेल असं एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. लंडनच्या थिंकटँक हाऊसमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमात पाकिस्तानी पत्रकार निसालने विचारलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचे संबंध वापरून काश्मीर समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू शकतात का, त्यावर एस जयशंकर यांनी एका वाक्यात उत्तर दिले. जर पाकिस्तानने काश्मीरातील एका भागावरील ताबा सोडला तर समस्याच राहणार नाही असं भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं. ते पुढे म्हणाले, भारताकडून काश्मीरमधील सर्व गोष्टी ठीक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काश्मीरचा विशेष राज्य दर्जा संपवून कलम ३७० हटवणं हे पहिले पाऊल होते. काश्मीरला आर्थिक सक्षम करत सामाजिक न्याय बहाल करणे दुसरं पाऊल होते. जास्त मतदानासह निवडणूक घेणे तिसरं पाऊल होते. आता काश्मीरचा तो भाग ज्यावर पाकिस्तानचा बेकायदेशीर ताबा आहे ते परत घेणे बाकी आहे. जेव्हा ते होईल तेव्हा समस्या सुटेल असं त्यांनी स्पष्ट सुनावले.
तसेच पाकिस्तानकडे काश्मीरचा जो भाग आहे, तो त्याने चोरी केला आहे असं सांगत जयशंकर यांनी काश्मीरमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन होतंय या आरोपाचाही समाचार घेतला. आम्हाला राजकीय कारणामुळे या मुद्द्यावर टीकेचा सामना करावा लागतो. काही परिस्थितीत सुधारणा गरजेची असते कारण भारतात मानवाधिकार रेकॉर्ड पाहिला तर तो जगातील इतर देशांच्या तुलनेत चांगला आहे. भारतात मानवाधिकार उल्लंघनाबाबत जी चिंता व्यक्त केली जाते ती चुकीची आहे असंही परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सांगितले.
दरम्यान, चीनसोबतच्या संबंधावर बोलताना दोन्ही देशाचा इतिहास जुना आहे. ज्यात वेळोवेळी बऱ्याचदा चढ-उतार आलेत. आज दोन्ही देश चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. मुख्य मुद्दा हा आहे की, हे संबंध स्थिर आणि समतोल कसे बनवले जातील. आम्हाला स्थिर संबंध हवेत, ज्यातून आमच्या हिताचा सन्मान केला जाईल असं एस जयशंकर यांनी म्हटलं.
पाकिस्तानला भारताचे खडे बोल
काश्मीर प्रश्नावरून एस जयशंकर यांनी कठोर भूमिका घेतली. मागील वर्षीही एस जयशंकर यांनी म्हटलं होतं, पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर हा भारताचा भाग आहे. पीओके पुन्हा भारताला मिळावा यासाठी भारतातील प्रत्येक राजकीय पक्ष कटिबद्ध आहे. ही आमची राष्ट्रीय वचनबद्धता आहे असंही एस जयशंकर यांनी सांगितले.